अणुऊर्जेवर चालणारे स्काय हॉटेल | पुढारी

अणुऊर्जेवर चालणारे स्काय हॉटेल

वॉशिंग्टन : जमिनीवर अनेक प्रकारची हॉटेल्स पाहायला मिळतात. मात्र, आता आकाशातील आणि अंतराळातीलही हॉटेलची चर्चा आहे. भविष्यात मोठ्या विमानांच्या रूपात ‘स्काय हॉटेल्स’ पाहायला मिळतील. ही विमानं इतकी मोठी असतील की त्यामध्य जीम, स्विमिंग पूल आणि शॉपिंग मॉलही असेल. तसेच यामधून एकाच वेळी पाच हजार लोक प्रवास करू शकतील. हे विमान अणुऊर्जेवर संचालित होईल हे विशेष!

एखादे क्रूझ शिप म्हणजे पाण्यावर तरंगणारे शहरच असते. आता आकाशात विहरणारे असेच शहर या ‘स्काय हॉटेल्स’च्या रूपाने पाहायला मिळतील. एका नव्या ‘सीजीआय’ व्हिडीओमध्ये या संकल्पनेची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की 20 इंजिन असलेले हे विमान आकाशावर राज्य करील. या विमानात अशा सुविधा असतील की अनेक महिने हे विमान जमिनीवर उतरवण्याची गरजच भासणार नाही. नव्या प्रवाशांना विमानात आणण्यासाठी तसेच विमानात असलेल्या लोकांना जमिनीवर सोडण्यासाठी सध्या ज्या आकाराची विमाने पाहायला मिळतात तशी विमाने या स्काय हॉटेलला जोडली जातील. जमिनीवरून खाद्य सामग्री व अन्य गरजेच्या गोष्टीही अशा विमानांमधून आणली जातील. या हॉटेलमुळे प्रदूषणाचा धोका नाही, कारण ते जेट फ्युएलपासून नव्हे तर न्यूक्‍लिअर पॉवर म्हणजेच अणुऊर्जेने चालेल. तेल भरण्याचे ‘टेन्शन’ नसल्याने ते अनेक महिने आकाशात उडत राहील. या महाकाय विमानाची कॉन्सेप्ट आर्टिस्ट टोनी होम्सटन यांनी दिली असून हाशेम अल्घैली यांनी त्याला व्हिडीओ रूप दिले आहे. हे विमान पायलटकडून नव्हे तर पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडून चालवले जाईल.

Back to top button