अमेरिका चंद्रावर बनवणार रॉकेटचा ‘पेट्रोल पंप’! | पुढारी

अमेरिका चंद्रावर बनवणार रॉकेटचा ‘पेट्रोल पंप’!

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने 2030 पर्यंत चंद्रावर एक न्यूक्‍लिअर रिअ‍ॅक्टर स्थापित करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चंद्राचा वापर एखाद्या ऑर्बिटिंग पॉवर स्टेशन किंवा सामान्य भाषेत रॉकेटसाठीच्या ‘पेट्रोल पंपा’साठी होऊ शकतो. ‘नासा’ने पॉवर सिस्टीमसाठी तीन डिझाईन कॉन्सेप्टस् प्रपोजल्सना निवडले आहे. त्यांना या दशकाच्या अखेरपर्यंत लाँच केले जाऊ शकते. ‘नासा’च्या आर्टेमिस प्रोग्रॅममधून चंद्रावर जाणारे अंतराळवीर त्यासाठीची तपासणी करतील.

आर्टेमिस प्रोग्रॅममध्ये 2025 पर्यंत तब्बल 50 वर्षांनंतर मानवाचे पाऊल चंद्रावर पडणार आहे. यामध्ये एका महिला अंतराळवीराचाही समावेश असेल हे विशेष. चंद्रावर 40 किलोवॅटचा न्यूक्‍लिअर पॉवर स्टेशन म्हणजेच अणुऊर्जा प्रकल्प उभा करण्याची ‘नासा’ची योजना आहे. हा प्रकल्प चंद्राच्या वातावरणात किमान दहा वर्षे टिकून राहू शकतो. भविष्यात या प्रकल्पाचा लाभ मानवाच्या मंगळ किंवा त्यापेक्षाही पुढील अंतराळ मोहिमांसाठी होऊ शकेल असा त्यामागील उद्देश आहे. मात्र, अशा प्रकारच्या प्रयोगशाळेसाठी ऊर्जा कुठून मिळणार हा प्रश्‍न आहे.

संशोधनासाठी चंद्रावर पाठवल्या जाणार्‍या रोव्हर्सना सौरऊर्जा पुरेशी असते. मात्र, मानवी तळासाठी ऊर्जेचा निरंतर आणि विश्‍वसनीय स्रोत गरजेचा आहे. ‘नासा’चे तज्ज्ञ यासाठी न्यूक्‍लिअर फ्यूजनकडे पाहत आहेत. या तंत्राचा पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. अन्य ऊर्जा प्रकल्पांच्या तुलनेत फ्यूजन सिस्टीम छोटी आणि हलकी असते. कोणत्याही ठिकाणी, हवामानात, उन्हात किंवा अन्य नैसर्गिक स्थितीतही हा प्रकल्प निरंतर ऊर्जा देऊ शकतो. त्यामुळे दीर्घकालीन व दीर्घ पल्ल्याच्या अंतराळ मोहिमांसाठी इंधन भरण्याचा हा चांगला मार्ग ठरू शकतो.

Back to top button