घरात झुरळे सोडून देणार दीड लाख रुपये! | पुढारी

घरात झुरळे सोडून देणार दीड लाख रुपये!

न्यूयॉर्क : झुरळ बघताच किंचाळणार्‍या व्यक्ती केवळ चित्रपटाच्या पडद्यावरच पाहायला मिळतात असे नाही. वास्तवातही असे लोक आहेत. झुरळ म्हटलं की, ते मारण्यासाठीच आटापिटा केला जातो. मात्र, हेच झुरळ कुणाच्या कमाईचे साधनही बनू शकेल असे आपल्याला वाटणार नाही. अमेरिकेत एक अशी कंपनी आहे की, जी घरात शंभर झुरळे सोडून त्या बदल्यात दीड लाख रुपये देईल!
नॉर्थ कॅरोलिनामध्ये ही पेस्ट कंट्रोल कंपनी आहे.

ती आपल्या नव्या कीड नियंत्रण औषधावर संशोधन चाचण्या करीत आहे. त्यामुळे या कंपनीला एकाच वेळी अनेक झुरळांची गरज आहे. त्यामुळे ही कंपनी अशा पाच ते सात कुटुंबांचा शोध घेत आहे, जिथे झुरळे आहेत. या झुरळांवर कंपनी आपल्या नव्या औषधाचा प्रयोग करून पाहणार आहे. कंपनी केवळ या घरातील झुरळांवरच समाधानी असणार नाही. संशोधनासाठी जे कुटुंब आपले घर देईल, त्यांच्या घरात ही कंपनी बाहेरून आणलेली शंभर झुरळेही सोडू शकते. तसेच त्यांच्यावर औषधाचा कसा परिणाम होतो याचे शूटिंग केले जाईल. या ऑफरद्वारे झुरळे सोडल्याच्या बदल्यात कुटुंबाला पैसे मिळतील. ही सर्व झुरळे प्रयोग संपल्यावर नष्ट केली जातील. अर्थातच या संशोधनात सहभागी असणारे कुटुंब हे अमेरिकेतीलच असावे लागणार आहे व त्यांनी कंपनीला संशोधनासाठी लेखी परवानगी देणेही आवश्यक आहे. अशा कुटुंबाला 2 हजार डॉलर्स म्हणजेच दीड लाख रुपयांपेक्षाही अधिक पैसे दिले जातील.

Back to top button