‘या’ देशात माणसांपेक्षा मांजरंच अधिक! | पुढारी

‘या’ देशात माणसांपेक्षा मांजरंच अधिक!

लंडन : जगात प्रत्येक देशाची स्वतःची एक वेगळी ओळख असते. त्यामध्ये देशाची संस्कृती, खाद्यपदार्थ, पेहराव, भाषा वगैरे अनेक गोष्टींचा समावेश असतो. मात्र, एक देश असा आहे ज्याची ओळख माणसांमुळे नव्हे तर मांजरांमुळे बनलेली आहे. या देशात माणसांपेक्षा मांजरंच अधिक आहेत!

या देशाचे नाव आहे सायप्रस. अतिशय निसर्गरम्य असा हा देश आहे. कमी क्षेत्रफळात लोकसंख्येची अधिक घनताही या देशात आहे. मात्र, या लोकसंख्येपेक्षाही अधिक मांजरं या देशात आहेत! देशातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मांजर मस्तपैकी लोळत पडलेली दिसून येतात.

येथील लोकांना या मांजरांचं फारस अप्रूप वाटत नाही, कारण त्यांच्यासाठी ही नेहमीचीच गोष्ट बनली आहे. मात्र, परदेशातून आलेले लोक या मांजरांच्या फौजेकडे आश्चर्याने पाहत असतात. सायप्रसची लोकसंख्या सुमारे बारा लाख आहे. मात्र, येथील मांजरांची संख्या पंधरा लाखांच्या आसपास आहे.

माणसांपेक्षाही एक-दोन लाख अधिक संख्येने मांजरं या देशात असल्याने या देशाला ‘मांजरांचा देश’ असेही म्हटले जाते. विशेष म्हणजे येथील लोकांना मांजरांचा कोणताही उपद्रव जाणवत नाही. स्विमिंग पूल, हॉटेल, शाळा-कॉलेजच्या बाहेर अनेक मांजरं खाण्याच्या आशेने घुटमळत असतात. या मांजरांबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत.

Back to top button