कसा फैलावला होता प्लेग? | पुढारी

कसा फैलावला होता प्लेग?

बिश्केक : जग अजूनही कोरोना महामारीच्या विळख्यातून मुक्त झालेले नाही. अशा अनेक प्रकारच्या महामारी जगात येऊन गेल्या. आतापर्यंतच्या सर्वात खतरनाक महामारींमध्ये ‘ब्लॅक डेथ’चाही समावेश होतो. ‘ब्लॅक डेथ’ किंवा प्लेगची सुरुवात कशी झाली याबाबत रहस्यच आहे. मात्र, आता संशोधकांनी म्हटले आहे की त्यांनी 684 वर्षांपूर्वीचे हे रहस्य उलगडण्यात यश मिळवले आहे. प्राचीन मृतदेहांच्या अवशेषांची डीएनए टेस्ट करून हे संशोधन झाले.

चौदाव्या शतकात या प्लेगने संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. त्यामुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक दशकांपासून या महामारीच्या उत्पत्तीचा विषय चर्चेचा बनलेला आहे. यामध्ये अनेक प्रकारचे सिद्धांत होते; पण पुराव्यांचा अभाव होता. आता सध्याच्या किर्गीस्तानातील एका दफनभूमीतून मिळालेल्या प्राचीन मृतदेहांच्या अवशेषांमधील डीएनए विश्लेषण करून संशोधकांनी प्लेगच्या सुरुवातीची तारीख सन 1338 सांगितली आहे.

याठिकाणी दफन केलेल्या लोकांच्या दातात संशोधकांना प्लेग फैलावणार्‍या बॅक्टेरियाचेही डीएनए सापडले. संशोधकांनी म्हटले आहे की एका दशकापेक्षाही कमी काळात संपूर्ण जगात प्लेग फैलावला. त्याचा डीएनए आणि किर्गीस्तानात मिळालेला डीएनए एकसारखाच आहे.

जर्मनीच्या लीपजिगमधील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इवोल्युशनरी अँथ—ोपोलॉजीचे प्राध्यापक जोहान्स क्रूस आणि अन्य संशोधकांनी आपल्या संशोधनाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात दिली आहे. या संशोधनामुळे अनेक प्रकारचे अनुमान आता संपुष्टात आले आहेत. या संशोधनातून अशा स्थितींबाबतचीही माहिती मिळेल ज्यामुळे ‘ब्लॅक डेथ’ उद्भवला. काही जुन्या आजारांना समजून घेणेही शक्य होईल.

Back to top button