भविष्यात मंगळावर कसे राहतील अंतराळयात्री? | पुढारी

भविष्यात मंगळावर कसे राहतील अंतराळयात्री?

ह्यूस्टन : ‘मंगळ’ अथवा लालग्रहावर एक महिना अथवा त्याहून अधिक काळ मानवाला ठेवण्याची तयारी अमेरिकन संशोधन संस्था ‘नासा’ करत आहे. जेणेकरून अंतराळयात्री तेथे थांबून मंगळाचा जास्तीत जास्त अभ्यास करू शकतील. मात्र, शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्स यांच्यातील चर्चेचा मुद्दा म्हणजे, अंतराळ यात्री महिनाभर थांबून मंगळावर करणार काय?

मंगळावर एकदा का अंतराळयात्री गेले की, तेथे ते काय करतील, काय खातील, तसेच जिवंत राहण्यासाठी त्यांना कोणत्या कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागेल, या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यात येत आहेत. असे असले तरी नासाने मंगळावरील बेसचे नावही निश्‍चित केले आहे.

मंगळावर बनणार्‍या पहिल्या मानवी बेसला ‘मार्स बेस 101’ असे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भात गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत वर नमूद केलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. यामधून एक दुसरीच कल्पना समोर आली. मानवी मोहीम आयोजित करण्यापूर्वी मंगळावर रोबोटिक मिशन पाठवावे, जेणेकरून मंगळावर नेमक्या कोणत्या उपकरणांची गरज भासणार आहे, याची चाचपणी करता येईल.

दरम्यान, ह्यूस्टनस्थित जॉन्सन स्पेस सेंटरचे शास्त्रज्ञ पॉल नाईल्स यांनी सांगितले की, मंगळावर 30 दिवस राहणार्‍या अंतराळयात्रींना विश्रांतीपेक्षा जास्त काम करावे लागणार आहे. कारण, त्यांच्यामुळेच आम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळणार आहे. पहिल्या कथित मानवी मोहिमेनंतर मंगळाबाबत अनेक प्रकारचे संशोधन होईल. यामुळे मंगळ ग्रहावर भविष्यात मानवी वस्ती स्थापन करण्यास मदत णार आहे. संशोधक मिशेल रकर यांनी सांगितले की, अशा मोहिमांसाठी यंत्रांना पाठविणे अधिक सोयीचे ठरते. कारण, मानवाला सर्व सुविधा पुरवाव्या लागतात. मात्र, तशा सुविधा पुरवण्याची गरज यंत्राला भासत नाही.

Back to top button