‘तिचा’ विमानाचा इमर्जन्सी दरवाजा उघडून पंखावर फेरफटका ! | पुढारी

‘तिचा’ विमानाचा इमर्जन्सी दरवाजा उघडून पंखावर फेरफटका !

लंडन : काही माणसं भलतीच उपद्व्यापी असतात व ती कधी, काय करतील याचा नेम नसतो. अगदी विमानासारख्या ठिकाणी असे उपद्व्याप घडलेले आहेत. युक्रेनच्या एका महिलेने विमानात उकडत होते म्हणून चक्क इमर्जन्सी दरवाजा उघडला व विमानाच्या पंखावर फेरफटका मारला. अर्थात त्यावेळी विमान जमिनीवरच होते हे सुदैव!

तुर्कीवरून आलेले ‘बोईंग 737-86 एन’ विमान युक्रेनच्या कीव शहरातील विमानतळावर लँड झाल्यानंतर ही विचित्र घटना घडली. विमान धावपट्टीवर उतरले असतानाच आत उष्मा वाढल्याची तक्रार या महिलेने केली आणि मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजा उघडला. तेथून ती सरळ विमानाच्या विंगवर चालत गेली. विमान लँड झाल्यावर जवळजवळ सर्व प्रवासी उतरले. ही महिलाही मागे मागे येत होती; पण अचानक तिने इमर्जन्सी दरवाजा उघडून विमानाच्या विंगवर जाऊन बसणे पसंत केले. त्यानंतर युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सने या महिलेवर कारवाई करीत तिला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे.

Back to top button