सात अब्ज वर्षांपूर्वी झाले होते दोन कृष्णविवरांचे मिलन | पुढारी

सात अब्ज वर्षांपूर्वी झाले होते दोन कृष्णविवरांचे मिलन

वॉशिंग्टन : खगोल शास्त्रज्ञांनी आता तब्बल सात अब्ज वर्षांपूर्वीच्या एका घटनेचा छडा लावला आहे. त्यावेळी दोन कृष्णविवरे एकमेकांमध्ये मिसळून गेली होती. ब्रह्मांड निम्म्या वयाचे असताना ही घटना घडली होती. आता संशोधकांनी या घटनेनंतर उत्पन्न झालेल्या गुरुत्वाकर्षणीय लहरीचा शोध घेतला आहे. या लहरीपासून आलेल्या सिग्नलला ‘जीडब्ल्यू190521’ असे नाव देण्यात आले आहे. त्याचा छडा 21 मे 2019 या दिवशी लागला. नॅशनल सायन्स फाऊंडेशनच्या लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरीने याबाबतचे संशोधन केले आहे. दोन न्युट्रॉन तारे किंवा दोन कृष्णविवरे एकमेकांमध्ये विलीन झाली की अशा ‘बायनरी मर्जर’मधून गुरुत्वाकर्षणीय लहरींचे सिग्नल उत्पन्न होतात. सात अब्ज वर्षांपूर्वी दोन कृष्णविवरे एकमेकांमध्ये विलीन झाल्याची घटना आतापर्यंतची सर्वात मोठी घटना होती असे दिसून आले आहे. सूर्यापेक्षा 85 आणि 66 पटीने अधिक वस्तुमान असलेली ही कृष्णविवरे होती. नेल्सन ख्रिस्टेन्सन या संशोधकांनी ही माहिती दिली. एखाद्या तार्‍याचा मृत्यू झाला की त्यांचे रूपांतर प्रचंड आकर्षणशक्ती असलेल्या पोकळीत होते व त्यालाच ‘कृष्णविवर’ असे म्हटले जाते.

Back to top button