वाणी ‘बेल बॉटम’साठी स्कॉटलंडला रवाना | पुढारी

वाणी ‘बेल बॉटम’साठी स्कॉटलंडला रवाना

मुंबई : चित्रपटसृष्टी आता हळूहळू कोरोना संकटाच्या धक्क्यातून सावरते आहे. अनेक चित्रपटांचे शूटिंग सध्या सुरू झाले आहे. अक्षय कुमारच्या आगामी ‘बेल बॉटम’ चित्रपटाचेही शूटिंग आता सुरू होणार आहे. यामध्ये नायिका आहे वाणी कपूर. वाणी नुकतीच शूटिंगसाठी स्कॉटलंडला रवाना झाली.

बॉलीवूडमधील अनेक कलाकारांप्रमाणेच वाणीही गेल्या पाच महिन्यांपासून शूटिंगसाठी उतावीळ झाली होती. लॉकडाऊन आणि कोरोना महामारीमुळे अर्थातच ते शक्य होत नव्हते. आता शूटिंगला परवानगी मिळाल्याने देशातही अनेक मालिका व चित्रपटांचे शूटिंग सुरू झालेले आहे. लॉकडाऊनच्या काळातच वाणीच्या पदरी दोन चित्रपटही पडले. एका मुलाखतीत वाणीने सांगितले, मी चित्रपटाचे शूटिंग सुरू करीत आहे व हा एक सुंदर अनुभव आहे. सेटवर परतण्याच्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते. आता ‘बेल बॉटम’च्या शूटिंगसाठी मी उतावीळ झाले आहे. मी पाच महिन्यानंतर मुंबईबाहेर जात आहे. असे वाटत आहे की जणू काही एक नवे जीवन मिळाले आहे आणि पुन्हा एकदा आवडीच्या गोष्टी करण्याची संधी मिळाली आहे! सर्वांसाठीच हे वर्ष कठीण परीक्षेचे ठरले. मात्र, हळूहळू पुन्हा सर्व काही सुरळीत होत आहे ही आनंदाची बाब आहे. अक्षय सरांबरोबर मी प्रथमच काम करीत आहे आणि हा अनुभव खासच असणार हे मला माहिती आहे. त्यांच्याकडून मला बरेच काही शिकण्यास मिळेल. ते आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायक आहेत. लोकांनाही आमची जोडी आवडेल अशी मला आशा आहे!

Back to top button