कोरोनाला ‘ब्लॉक’ करू शकणार्‍या ‘नॅनोबॉडी’चा शोध | पुढारी

कोरोनाला ‘ब्लॉक’ करू शकणार्‍या ‘नॅनोबॉडी’चा शोध

लंडन : ‘कोव्हिड-19’ विरुद्ध लढण्यासाठी आता संशोधकांना एक मोठे शस्त्र गवसले आहे. त्यांनी एका न्यूट्रलायझिंग अँटिबॉडीचा शोध घेतला असून त्याला ‘नॅनोबॉडी’ असे म्हटले जात आहे. या नॅनोबॉडीमध्ये ‘सार्स-कोव्ह-2’ या कोरोना विषाणूला मानवी पेशीत रोखण्यापासून अटकाव करण्याची क्षमता आहे. 

‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध झाली आहे. ‘कोव्हिड-19’ विरुद्ध अँटिव्हायरल ट्रिटमेंटसाठी या नॅनोबॉडीचा चांगला उपयोग होऊ शकेल असे संशोधकांनी म्हटले आहे. स्विडनच्या कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील गेराल्ड मॅकइनेर्नी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘कोव्हिड-19’ महामारीविरुद्ध लढत असताना हे संशोधन उपयुक्‍त ठरेल असे त्यांनी सांगितले. उंट किंवा तत्सम प्राण्यांमध्ये अशा नॅनोबॉडीज नैसर्गिकरीत्या आढळतात व त्या मानवी शरीरात वापरता येऊ शकतात. अशा नॅनोबॉडींचा शोध फेब—ुवारीपासूनच सुरू झाला होता.

वेळी अल्पाका नावाच्या प्राण्यामध्ये नव्या कोरोना विषाणूचे स्पाईक प्रोटिन सोडण्यात आले. हे प्रोटिन पेशींमध्ये प्रवेश करते. साठ दिवसांनंतर अल्पाकाच्या रक्‍ताचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले. त्यावेळी अल्पाकाच्या शरीराने या स्पाईक प्रोटिनविरुद्ध अतिशय मजबूत प्रतिकारक प्रतिक्रिया दिल्याचे दिसून आले. त्यानंतर संशोधकांनी अल्पाकाच्या ‘बी’ पेशी म्हणजेच एक प्रकारच्या पांढर्‍या रक्‍तपेशींपासून नॅनोबॉडी वेगळ्या काढल्या व त्यांचे अध्ययन करून त्यांची प्रतिरूपे बनवली. त्यांना ‘टीवाय 1’ म्हणजेच अल्पका टायसन 1 असे नाव देण्यात आले. पेशींच्या ‘एसीई 2’ रिसेप्टरला विषाणूचे जे स्पाईक प्रोटिन जोडले जाते त्याला या नॅनोबॉडी ‘ब्लॉक’ करतात असे दिसून आले. त्यामुळे विषाणूचे शरीरात संक्रमण होऊ शकत नाही.

Back to top button