कोरोनाने केलेल्या नुकसानीचे शरीर स्वतःच करते दुरुस्ती | पुढारी

कोरोनाने केलेल्या नुकसानीचे शरीर स्वतःच करते दुरुस्ती

वॉशिंग्टन ः सध्या कोरोना महामारीने संपूर्ण जगालाच ‘त्राही माम्’ करून सोडले आहे. कोरोना पीडित लोकांमध्ये दीर्घकाळापर्यंत फुफ्फुस व हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात अशीही उदाहरणे समोर आल्याने चिंता वाढली होती. मात्र, आता असे दिसून आले आहे की अशा समस्यांवर शरीर नैसर्गिकरीत्याच आपल्या प्रतिकार शक्तीने मात करू शकते व या समस्या हळूहळू कमी होऊ लागतात.

युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटी इंटरनॅशनल काँग्रेसने याबाबतचे संशोधन केले आहे. त्यानुसार कोरोनामुळे शरीराला मिळालेल्या काही आजारांच्या समस्या हळूहळू कमी होत आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे मानवी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता. ती फुफ्फुसं आणि हृदयाशी संबंधित समस्यांना हळूहळू ठीक करते. ऑस्ट्रियाच्या टायरोलीन प्रांतात कोरोना हॉट स्पॉटमधील लोकांवर याबाबतचे संशोधन करण्यात आले. या लोकांना कोरोना निगेटिव्ह झाल्यावर त्यांना इन्सबर्गच्या युनिव्हर्सिटी क्लिनिकच्या इंटर्नल मेडिसिन डिपार्टमेंट आणि जान्मच्या विंजेंज हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले. काही लोकांना मुंतसरच्या कार्डियो-पल्मोनरी सेंटरमध्येही ठेवले गेले. संशोधकांनी 29 एप्रिलपासून 9 जूनपर्यंत 86 रुग्णांवर लक्ष ठेवले. हे लोक सुरुवातीला रिसर्च सेंटरमध्ये आले त्यावेळी त्यापैकी किमान निम्म्या लोकांमध्ये कफ, श्वासोच्छ्वासाची समस्या होती. त्यापैकी 88 टक्के लोकांच्या फुफ्फुसांवर विपरित परिणाम झाला होता. बारा आठवड्यांनंतर त्यांची पुन्हा तपासणी केल्यावर त्यांच्या फुफ्फुसांचे नुकसान घटल्याचे दिसून आले.

 

Back to top button