अंतराळातही जिवंत राहू शकतो ‘हा’ जीव! | पुढारी

अंतराळातही जिवंत राहू शकतो ‘हा’ जीव!

न्यूयॉर्क ः या पृथ्वीतलावर अनेक अनोखे जीव आहेत. मात्र, त्यामध्ये पाण्यातील ‘अस्वल’ म्हटल्या जाणार्‍या जीवाचे वेगळे वैशिट्य आहे. जमिनीवरचे अस्वल आपण पाहिलेले आहेच; पण पाण्यातील हे ‘अस्वल’ तितके मोठे नसते. पूर्ण वाढ झालेला हा प्राणी अवघा 0.02 इंच किंवा 0.5 मिलीमीटर लांबीचा असतो. सर्वसाधारणपणे दलदलीत राहणारा हा जीव आकाराने अतिशय लहान असला तरी त्याची विपरित स्थितीत तग धरून राहण्याची क्षमता अतिशय मोठी असते. हा जीव बर्फ, वाळवंट आणि अगदी अंतराळातही जिवंत राहू शकतो!

या जीवाचे नाव आहे ‘टाडिग्रेड’. बोलीभाषेत त्याला ‘वॉटर बिअर’ असेही म्हटले जाते. संशोधकांनी टार्डिग्रेडच्या दोन प्रजातींचे डीएनए डिकोड करून त्यांच्या जनुकीय संरचनेचा शोध घेतला आहे. ते अतिशय कडक दुष्काळातही तग धरून राहतात आणि पुन्हा सक्रिय होतात. ‘पीएलओएस बायोलॉजी’ या नियतकालिकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मोठमोठ्या आपत्तीतही जिवंत राहण्याची या जीवाची क्षमता थक्‍क करणारीच आहे. त्याला ही क्षमता त्याच्यामधील विशिष्ट जनुकांमुळे मिळते. दुष्काळाच्या स्थितीत टार्डिग्रेडमधील ही विशिष्ट जनुके सक्रिय होतात. ती त्याच्या पेशींमध्ये पाण्याची जागा घेतात आणि काही महिने किंवा वर्षांनंतर ज्यावेळी पुन्हा पाणी उपलब्ध होते त्यावेळी हे जीव आपल्या पेशींना पुन्हा पाण्याने भरतात. या जीवाला आठ जाडसर पाय असतात. त्यांचे डोके आणि शेपटीच्या विकासाला नियंत्रित करणार्‍या ‘एचओएक्स जीन’ची संख्या केवळ पाच असते.

Back to top button