चंद्र आणि मंगळावरही तयार होतील आता घरे

न्यूयॉर्क : मंगळावर मानवी वस्ती स्थापन करण्याच्या दिशेने सध्या संशोधन सुरू आहे. असे असतानाच चंद्र आणि मंगळावर अंतराळयात्रींसाठी घरे बांधण्यास आम्ही सक्षम आहोत, असा दावा अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने केला आहे.
‘नासा’च्या शास्त्रज्ञांच्या मते, मंगळ आणि चंद्रावर घरे बांधण्यासाठी लागणारे साहित्य तेथेच तयार करावे लागणार नाही, तर उगवावे लागणार आहे. आपल्या पारंपरिक घरांसारख्या घरांना अंतराळात एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेणे, ही बाब अशक्यप्राय आहे. याशिवाय अशी घरे फार मोठी असतात, त्यामुळे त्यांना जास्त जागाही लागते. या परिस्थितीत अशा घरांचे साहित्य अवकाशात नेणे, हेसुद्धा अंतराळ मोहिमेला धोक्यात टाकणारे ठरू शकते.
कॅलिफोर्नियातील ‘नासा’च्या एम्स रिसर्च सेंटरमधील एक मायक्रोआर्किटेक्चर या समस्येचे समाधान शोधण्यात कार्यरत आहे. तेथे त्याने एक फंगस (बुरशी) वनस्पती उगवली. या वनस्पतीस मायसेलिया असेही म्हणतात. याच वनस्पतीपासून तयार होणार्या ठोस साहित्याचा वापर अवकाशात घरे तयार करण्यासाठी होऊ शकतो. हा प्रकल्प म्हणजे ‘नासा’च्या इनोवेटिव्ह अॅडव्हान्स्ड कॉन्सेप्ट योजनेचा एक भाग आहे.
मंगळावर मानवी वस्ती स्थापन करणे, हे मानवाचे सध्या तरी स्वप्नच आहे. मात्र, याच स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी जगभरातील खगोलशास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. त्यात घराच्या स्वप्नाचाही अंतर्भाव आहे.