कोरोना विषाणूने संक्रमित झाल्यावर ‘अशा’ दिसतात पेशी... | पुढारी

कोरोना विषाणूने संक्रमित झाल्यावर ‘अशा’ दिसतात पेशी...

न्यूयॉर्क :

कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्यानंतर पेशी कशा दिसतात, याची प्रतिमा आता अमेरिकन संशोधकांनी प्रसिद्ध केली आहे. संशोधकांनी प्रयोगशाळेत माणसाच्या ब—ॉन्कियल एपिथीलियल पेशींमध्ये कोरोना इंजेक्ट केला. त्यानंतर पेशीमध्ये फैलावणार्‍या विषाणूंच्या प्रतिमा टिपण्यात आल्या. पेशींवर वाढणार्‍या एखाद्या गुच्छासारखे हे विषाणू दिसतात. पेशींमधील लाल रंगाची रचना ही कोरोना विषाणूची आहे. अमेरिकेतील ‘यूएनसी स्कूल ऑफ मेडिकल लॅबोरेटरी ऑफ कॅमिल एहरे’च्या रिपोर्टनुसार ही छायाचित्रे श्‍वासनलिकेतील कोरोना संक्रमणाची आहेत. श्‍वासनलिकेत कोरोनाचे संक्रमण कसे फैलावते, हे यावरून समजून घेता येऊ शकते. या प्रतिमा न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. संशोधक कॅमिल यांनी दिलेल्या माहितीनुसार माणसाच्या ब—ॉन्कियल एपिथीलियल पेशींमध्ये कोरोना इंजेक्ट केल्यानंतर त्यावर 96 तास नजर ठेवण्यात आली. त्यांना इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने पाहता येऊ शकते. प्रतिमेत रंग समाविष्ट करून विषाणूचे अस्तित्व ठळकपणे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रतिमेतील निळ्या रंगाच्या लांब रचनांना ‘सीलिया’ असे म्हटले जाते. तिच्या मदतीने फुफ्फुसातून म्युकस (द्रव) बाहेर काढला जातो. विषाणूच्या संक्रामक प्रकाराला ‘व्हायरॉन्स’ म्हटले जाते. ते लाल रंगाच्या गुच्छाच्या रूपात दिसून येतात.

Back to top button