येत्या पाच वर्षांत वाढू शकते 1.5 अंश तापमान | पुढारी

येत्या पाच वर्षांत वाढू शकते 1.5 अंश तापमान

संयुक्‍त राष्ट्रे : जगातील काही नेत्यांनी पाच वर्षांपूर्वी पृथ्वीच्या तापमानवाढी संदर्भात एक अंदाज निश्‍चित केला होता. मात्र तो आता पार होण्याच्या उंबरठ्यावर आहे. संयुक्‍त राष्ट्राच्या एका नव्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालातील दाव्यानुसार येत्या पाच वर्षांत पृथ्वीचे तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंतची ही एक मोठी आणि चिंताजनक वाढ असेल.  

संयुक्‍त राष्ट्र संघाने 2018 मध्येच पृथ्वीच्या तापमान वाढीसंदर्भात आणि संभाव्य परिणामाबाबत जगातील तमाम देशांना सावधानतेचा इशारा दिला होता. संयक्‍त राष्ट्र, जागतिक हवामान विभाग व विज्ञान संस्थेने तयार केलेल्या संयुक्‍त अहवालात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार 2015 मध्ये करण्यात आलेल्या पॅरिस कराराचा म्हणावा तसा फायदा झालेला नाही. चालू वर्षाच्या सुरुवातीलाच डेथ व्हॅलीचे तापमान तब्बल 54.4 अंश सेल्सियसवर पोहोचले होते. तर जगातील सर्वात थंड प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या सैबेरियाचे कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. 

दरम्यान, अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे नोह डिफेनबाऊ यांच्या मतानुसार, तापमानातील ही वाढ अनपेक्षित आहे. तसेच यामुळे इतिहासातील गंभीर घटनांचा भविष्यातही अनुभव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच भविष्यात जागतिक तापमावाढीचा वेगही दुप्पट होण्याची शक्यता आहे.

Back to top button