कोरोनाने हृदय आणि फुफ्फुसांचेही नुकसान  | पुढारी

कोरोनाने हृदय आणि फुफ्फुसांचेही नुकसान 

लंडन : कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन परतणार्‍या लोकांच्या शरीरावर या घातक विषाणूचा दीर्घकालीन प्रभाव दिसून येऊ लागला आहे.

संशोधकांच्या मते, संक्रमित रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन परतल्यानंतर अनेक आठवड्यापर्यंत संबंधितांच्या हृदय व फुफ्फुसांना कोरोनापासून धोका निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र, हे मानवी अवयव असे आहेत की, ते वेळेनुसार आपोआप स्वत:च दुरुस्त होत असतात. म्हणजेच या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या अवयवांमध्ये असे कोणते तरी तंत्र आहे की, त्यामुळे हे अवयव स्वत:च दुरुस्त होत असतात. 

युरोपिय रेस्परटोरी सोसायटी इंटरनॅशनल काँगे्रसमध्ये यासंबंधीचा संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. हे संशोधन ऑस्ट्रियातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 86 रुग्णांवर करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर 12 ते 24 आठवड्यांनंतर तपासणीसाठी बोलविण्यात आले. सहा आठवड्यानंतर अर्ध्यांहून अधिक रुग्णांमध्ये श्‍वास कोंडण्याची समस्या आढळून आली. ज्यावेळी त्यांचे सिटीस्कॅन करण्यात आले, त्यावेळी सुमारे 88 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांवर नजर ठेवणे आणि गरज भासल्यास उपयुक्‍त उपचार करण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष या संशोधनात काढण्यात आला.

Back to top button