ओझोन थराचा लहान छेदही धोकादायकच | पुढारी | पुढारी

ओझोन थराचा लहान छेदही धोकादायकच | पुढारी

न्यूयॉर्क : गतवर्षी ‘नॅशनल ओशियानिक अँड अ‍ॅटमोस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेेशन’ (एनओएए) आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने अंटार्क्टिका महाद्वीपावर जगाला सूर्याच्या अत्यंत धोकादायक  ‘अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन’पासून  वाचवणार्‍या ‘ओझोन’ थराला एक लहान छेद पडल्याचे शोधून काढले होते. आकडेवारीचा विचार केला तर आजपर्यंतचा हा अत्यंत लहान छेद होता. लहान असला तरी तो आव्हानात्मकच ठरतो. कारण यातून पृथ्वीवरील तमाम देश कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन आणि प्रदूषण कमी करण्याबाबत किती सजग आहोत, हेच सिद्ध होते. 

गेल्या काही वर्षांत बहुतेक देशांनी यावर भरपूर काम केले आहे. मात्र, ओझोन थराचे झालेले नुकसान कसे भरून काढता येईल, याचा उपाय सापडला नाही. मात्र, या प्रयत्नातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, ओझोन थराच्या नुकसानीसाठी जागतिक तापमानवाढच जबाबदार आहे. 

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ओझोनच्या थराकडून सूर्याच्या विकिरणापासून पृथ्वीचे संरक्षण होते. मात्र, या थराचे नुकसान झाल्यास गंभीर परिणाम पृथ्वीला सोसावे लागतील. यामुळे या थराचे नुकसान होऊ नये यासाठी तमाम देशांनी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे ठरते. सूर्याच्या या किरणांपासून मानवाला त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू असे आजार होण्याबरोबर वनस्पतींचेही मोठे नुकसान होते.

Back to top button