हृदयाच्या ठोक्यांवरून होऊ शकेल डिप्रेशनचे निदान | पुढारी

हृदयाच्या ठोक्यांवरून होऊ शकेल डिप्रेशनचे निदान

बर्लिन : शारीरिक आजारांकडे जसे गांभीर्याने पाहिले जात असते तितके मानसिक समस्यांकडे पाहिले जात नाही. त्यामुळेच जगभरात सध्या डिप्रेशनचे म्हणजेच नैराश्य किंवा औदासिन्याचे रुग्ण वाढत आहेत. आता जर्मनीतील वैज्ञानिकांनी डिप्रेशनचे निदान करण्यासाठी एक नवी पद्धत शोधली आहे. जर रुग्णाच्या हृदयाचे ठोके (हार्ट बीट) वेगवान आहेत व रात्रीही ते तसेच राहत असतील तर हा डिप्रेशनचा इशारा असू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. अशा लोकांमध्ये हार्ट बीट एका मिनिटात दहा ते पंधरापर्यंत वाढतात.

जर्मनीच्या गोथे युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की हृदयाचे ठोके हे सर्वसाधारणपणे दिवसा अधिक असतात आणि रात्रीच्या वेळी ते कमी होत जातात. मात्र, डिप्रेशनच्या रुग्णांमध्ये ते सामान्य लोकांच्या तुलनेत रात्रीही अधिक असतात. या संशोधनासाठी 32 जणांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी सोळाजण डिप्रेशनशी झुंजत होते व त्यांचा हार्ट रेट तपासण्यात आला. याशिवाय अशा लोकांनाही सहभागी करून घेण्यात आले ज्यांच्यामध्ये पुढील चार दिवस व तीन रात्री डिप्रेशन दिसून आले नाही. डिप्रेशनच्या 90 टक्के प्रकरणांमध्ये हार्ट रेट वाढला असल्याचे दिसून आले. अधिक नैराश्य व बेचैनी असताना मानवी हृदयावर अधिक दबाव पडतो व त्याला अधिक काम करावे लागते. शरीरातील सूज येण्याचे एक कारण मानसिक अनारोग्यही असू शकते व त्याचा परिणाम चेतापेशी व हृदयाच्या ठोक्यांवर पडतो. ते समजून घेण्यासाठी चोवीस तास फिटनेस ट्रॅकर लावून हार्ट रेटची माहिती मिळवता येऊ शकते.

Back to top button