३१ कोटी वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणांचा शोध | पुढारी

३१ कोटी वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणांचा शोध

न्यूयॉर्क : तब्बल 31 कोटी 30 लाख वर्षांपूर्वी सरड्यासारखा एक प्राणी समुद्रकिनारी असलेल्या वाळूतून चालत गेला आणि त्याच्या पावलांच्या खुणा वाळूत उमटल्या. आता हीच जागा अमेरिकेतील ‘ग्रँड कॅनियन’ म्हणून ओळखली जाते. या विशाल दरीत संशोधकांनी या प्राण्याच्या पंज्यांनी उमटवलेल्या खुणा शोधून काढल्या आहेत.

ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कमध्ये शोधण्यात आलेल्या या सर्वात जुन्या पृष्ठवंशीय प्राण्याच्या पाऊलखुणा असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. टेट्रापोडस् या सरड्याच्या जातीच्या व चार पायांच्या प्राण्याने या काळाच्या ओघातही टिकून राहिलेल्या खुणा उमटवल्या आहेत. काही काळानंतर इथेच आणखी पाऊलखुणा निर्माण झाल्या. या पाऊलखुणाही त्याच प्रजातीच्या प्राण्याच्या चालण्याने निर्माण झाल्या असल्याचे संशोधकांना वाटते. टी-रेक्ससारखे डायनासोर अस्तित्वात येण्यापूर्वी हे सध्याच्या सरीसृपांचे प्राचीन पूर्वज अस्तित्वात होते. अ‍ॅलन क्रिल या नॉर्वेजियन संशोधकाने या पाऊलखुणा शोधल्या आहेत. 

Back to top button