अरुणाचल प्रदेशात पहिली ‘स्ट्रीट लायब्ररी’! | पुढारी

अरुणाचल प्रदेशात पहिली ‘स्ट्रीट लायब्ररी’!

इटानगर : अरुणाचल प्रदेशमधील मीना गुरुंग या महिलेने वाचकांसाठी पहिली ‘स्ट्रीट लायब्ररी’ सुरू केली आहे. रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या खुल्या रॅकमध्ये अनेक पुस्तके आणि समोर बसण्यासाठी दोन बाकांचीही व्यवस्था केली आहे. हे अनोखे ग्रंथालय सुरू होऊन दहा दिवसच झाले असले तरी त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक लोक याबाबत मीना यांचे कौतुकही करीत आहेत.

‘ग्रंथ हाच गुरू’ मानून अनेक लोकांनी जीवनात प्रगती केली आहे. ‘वाचाल तर वाचाल’ हे अक्षरशः खरे आहे. मात्र, सध्याच्या मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेटच्या जमान्यात वाचनाची आवड कुठे तरी हरवत चालली आहे. हे लक्षात घेऊन मीना गुरुंग यांनी हा उपक्रम सुरू केला. त्या एका सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. त्यांनी अरुणाचलच्या पापम पारे येथील निर्जुली येथे हे ग्रंथालय सुरू केले आहे. कोणत्याही कडी-कुलुपाशिवाय, खुल्या रॅकमध्ये अनेक पुस्तके ठेवलेली असली तरी येथील एकही पुस्तक अद्याप चोरीला गेले नाही याचाही मीना यांना आनंद आहे. अर्थात पुस्तक चोरीचीही त्यांना भीती वाटत नाही. याचे कारण म्हणजे पुस्तक चोरीला गेले तरी त्याचा वापर वाचनासाठीच होणार हे त्यांना माहिती आहे. मीना यांना मिझोराममधील ‘मिनी वे साईड लायब्ररी’पासून या ग्रंथालयाची प्रेरणा मिळाली.

Back to top button