स्वित्झर्लंडमध्ये सर्वात मोठे चॉकलेट म्युझियम! | पुढारी

स्वित्झर्लंडमध्ये सर्वात मोठे चॉकलेट म्युझियम!

जिनिव्हा : चॉकलेट बार खाणे हे केवळ लहान मुलांनाच आवडते असे म्हणणे म्हणजे उगीचच प्रौढत्व मिरवण्यासारखे आहे. चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंटस् असतात या कारणाखाली ते (हृदयाच्या आरोग्यासाठी!) मिटक्या मारत खाणारेही अनेक प्रौढ आहेत. ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ ही केवळ मुलांच्या भावविश्वातील कल्पना नाही. स्वित्झर्लंडमध्ये तर जगातील सर्वात मोठे चॉकलेट म्युझियम सुरू करण्यात आले आहे. 

ज्युरिख येथे 13 सप्टेंबरला या चॉकलेट म्युझियमचे उद्घाटन झाले. या संग्रहालयात जाताच दरवाजापासून अन्य अनेक वस्तू चॉकलेटपासून बनवलेल्या दिसतात. या ‘लिंट होम ऑफ चॉकलेट’मधील कारंजाही चॉकलेटचाच आहे. त्याची उंची तब्बल 30 फूट आहे. हा भव्य कारंजा म्युझियमचे महत्त्वाचे आकर्षण आहे. ज्यूरिखला अनेक लोक जगाची ‘चॉकलेट राजधानी’ म्हणतात. या लौकिकात आता हे संग्रहालय अधिक भर घालत आहे. इथे जगातील सर्वात मोठे लिंट चॉकलेट शॉपही आहे. त्याचे उद्घाटन महान टेनिस खेळाडू रॉजर फेडरर याने केले. या संग्रहालयाला भेट देणारे लोक आपल्यासोबत काही भेटवस्तूही घरी घेऊन जातात. इथे लोकांना चॉकलेटच्या इतिहासापासून त्याच्या उत्पादनापर्यंतची सर्व माहिती मिळते. येथील ‘चॉकलेटेरिया’ मध्ये लोक स्वतः चॉकलेट बनवूही शकतात.

Back to top button