पॉपस्टार मॅडोना करणार स्वतःच्याच बायोपिकचे दिग्दर्शन | पुढारी

पॉपस्टार मॅडोना करणार स्वतःच्याच बायोपिकचे दिग्दर्शन

न्यूयॉर्क : मॅडोनाची आज एक पॉपस्टार म्हणून दिगंत किर्ती आहे. जगभरात तिचे असंख्य चाहते आहेत. उतारवयातही तिने आपला रूबाब टिकवून ठेवलेला आहे. आता तिने स्वतःच्या जीवन प्रवासावर आधारित चित्रपट बनवण्याचे ठरवले आहे. त्याचे लेखन आणि दिग्दर्शन ती स्वतःच करणार आहे. ऑस्कर विजेता लेखक डियाब्लो कोडी हा या चित्रपटाचा सहलेखक असेल.

न्यूयॉर्कमधील झोपडपट्टीतील मुलगी ते जगप्रसिद्ध पॉप सम—ाज्ञी हा मॅडोनाचा प्रवास थक्क करणाराच आहे. त्यामुळे आता तो रूपेरी पडद्यावरही आणला जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती युनिव्हर्सल पिक्चर्सच्या डोन्ना लँगले आणि अ‍ॅमी पास्कल करणार आहेत. चित्रपटाचे नाव, चित्रीकरणाच्या तारखा आणि कलाकारांची नावे अद्याप ठरलेली नाहीत. याबाबत मॅडोनाने सांगितले, एक कलाकार, गायिका, नर्तकी आणि एक माणूस म्हणून माझा एकूणच प्रवास जगासमोर मांडण्याचे मी ठरवले आहे. हा चित्रपट अर्थातच संगीतावर केंद्रीत असेल. संगीतानेच मला जगण्याची आणि पुढे जात राहण्याची प्रेरणा दिली. अनेक चढ-उतारांनी भरलेल्या माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी लोकांना माहिती नाहीत. त्या मीच चांगल्याप्रकारे या चित्रपटातून दर्शवू शकते. पाच दशके पॉप गायिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या मॅडोनाने यापूर्वी ‘फिल्थ अँड विस्डम’ व ‘डब्ल्यू. ई.’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Back to top button