सांधेदुखीवरही हळद ठरते गुणकारी | पुढारी | पुढारी

सांधेदुखीवरही हळद ठरते गुणकारी | पुढारी

सिडनी : भारतीय मसाल्यांमधील अनेक पदार्थ आरोग्यासाठी गुणकारी असतात. त्यापैकी हळदीचे महत्त्व वेगळेच आहे. हळद कर्करोगावर गुणकारी आहे हे यापूर्वीच सिद्ध झालेले आहे. आता हळदीचा आणखी एक गुण ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी शोधला आहे. हळद सांधेदुखीवरही गुणकारी असल्याचे त्यांना आढळून आले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या टेजमेनिया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी आर्थरायटिसच्या (संधीवात) 70 रुग्णांवर हे संशोधन केले. या रुग्णांना गुडघेदुखीचा त्रास होता आणि त्यांच्या गुडघ्याच्या सांध्यांमध्ये आतून सूजही होती. या रुग्णांना बारा आठवडे रोज हळदीचे दोन कॅप्सूल देण्यात आले. तीन महिन्यांनंतर हळदीचा परिणाम दिसून आला. ‘एन्नल्स ऑफ इंटर्नल मेडिसिन’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. ज्या रुग्णांनी हळदीचे सप्लिमेंट घेतले त्यांच्यामध्ये गुडघ्यातील वेदना कमी झाल्याचे दिसून आले. ज्या रुग्णांनी हळदीचे सेवन केले नव्हते त्यांच्यामधील वेदना तशाच होत्या.

हळदीचे सेवन करणार्‍या रुग्णांच्या गुडघ्याचे स्कॅनिंग करून पाहिल्यावर असे दिसून आले की आतून फारसा फरक पडलेला नसला तरी वेदना मात्र कमी झालेल्या आहेत. आता यावर आणखी मोठ्या प्रमाणात चाचण्या घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, भारतातील तिरुवनंतपूरममधील श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने हळदीच्या सहाय्याने कर्करोगावरील उपचाराचे अमेरिकन पेटंट मिळवले आहे. हळदीमधील ‘करक्यूमिन’ या घटकाने कर्करोगावर उपचार होऊ शकतो असा इन्स्टिट्यूटचा दावा आहे. हळद ही मेंदूसाठीही गुणकारी असून अल्झायमर, डिमेन्शियापासून ते डिप्रेशनपर्यंत अनेक विकारांचा धोका कमी करते.

Back to top button