‘कोव्हिड-19’ चे सर्व प्रोटोकॉल लागू करणारे जगातील पहिले विमानतळ | पुढारी

‘कोव्हिड-19’ चे सर्व प्रोटोकॉल लागू करणारे जगातील पहिले विमानतळ

रोम :

इटलीतील रोमचे फ्युमिसिनो एअरपोर्ट हे ‘कोव्हिड-19’ शी निगडीत सर्व प्रोटोकॉल सक्‍तीने लागू करणारे जगातील पहिले विमानतळ ठरले आहे. त्याला ‘ट्रान्सपोर्ट रेटिंग एजन्सी स्कायट्रॅक्स’ने फाईव्ह स्टार रेटिंग दिले आहे. हे युरोपमधील अतिशय गजबजलेल्या विमानतळांपैकी एक असल्याने तेथील ही व्यवस्था प्रशंसनीयच ठरली आहे.

चीनपाठोपाठ इटलीत कोरोना संक्रमणाने हाहाकार माजवला होता. रोमच्या या विमानतळावरच 2019 मध्ये 4.35 कोटी प्रवासी आले होते. आता ‘कोव्हिड-19’ बाबत सुरक्षा जपण्यासाठी या विमानतळावर सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्यामागे 40 लोकांची मेहनत आहे. ही ‘बायो-सेफ्टी’ टीम प्रवाशांमधील सोशल डिस्टन्सिंगपासून ते मास्कपर्यंत सर्व गोष्टींवर लक्ष ठेवते. विशेषतः विमानतळाच्या ज्या भागात सर्वाधिक गर्दी असते तिथे या बाबींवर अधिक काळजीपूर्वक पाहण्यात येते. विमानतळावरील प्रवेशापासून बाहेर जाण्यापर्यंत सॅनिटायझेशनवरही लक्ष दिले जाते. विमानतळावरील लिफ्ट, एस्केलेटरसारखी ठिकाणे जिथे प्रवाशांच्या हाताचा नेहमी स्पर्श होत असतो अशी ठिकाणे यूवी सॅनिटायझरने साफ केली जातात. विमानतळावर प्रवाशांचे येण्या-जाण्याचे मार्ग सतत बदलत ठेवले जातात. वेटिंग लाऊंजमध्ये दोन सीटच्या मध्ये सेफ्टी बॅरिकेड लावले आहेत. टॉयलेटस्मध्येही दोन नळांच्या दरम्यान गॅप ठेवण्यात आला आहे. सर्वत्र विविध सूचना फलक लावून नियमांची माहिती दिलेली आहे.

Back to top button