कोरोनाला पूर्णपणे नष्ट करू शकणार्‍या रेणूचा शोध | पुढारी

कोरोनाला पूर्णपणे नष्ट करू शकणार्‍या रेणूचा शोध

टोरांटो : कॅनडातील संशोधकांनी कोरोना विषाणूला पूर्णपणे नष्ट करू शकणार्‍या रेणूचा शोध घेतला आहे. तो सामान्य अँटिबॉडी म्हणजेच प्रतिजैविकाच्या तुलनेत दहा पटीने लहान आकाराचा आहे. त्याचे नाव ‘एबी 8’ असे आहे. कोरोनामुळे होणार्‍या ‘कोव्हिड-19’ आजारावरील उपचारात त्याचा वापर करता येऊ शकेल असे संशोधकांना वाटते.

कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी म्हटले आहे की हा रेणू कोरोनाला मानवी पेशीशी जोडण्यापासून रोखतो. त्याचा कोणताही साईडइफेक्ट अद्याप समोर आलेला नाही. याबाबतच्या संशोधनात श्रीराम सुब्रह्मण्यम हे भारतीय वंशाचे संशोधकही सहभागी झाले. त्यांना आढळले की या रेणूचा समावेश असलेले औषध उंदरांना दिल्यावर त्यांना कोरोनापासून संरक्षण मिळते तसेच कोरोनाचे संक्रमण झालेले असेल तर त्यांच्यावर यशस्वी उपचारही होतो. हा एक अतिशय छोट्या आकाराचा रेणू असून तो कोरोनाला निष्क्रिय करतो. त्यापासून बनवलेले औषध अनेक प्रकाराने रुग्णाला दिले जाऊ शकते. अगदी हे औषध वासाद्वारेही घेता येऊ शकते. जॉन मेलर्स या संशोधकाने सांगितले की ‘एबी 8’ हे ‘कोव्हिड-19’च्या रुग्णांसाठी प्रभावी उपचार ठरू शकते. मानवी अँटिबॉडीचा एक भाग ‘व्हीएच’ डोेमेनशी मिळून बनलेला असतो. ‘एबी 8’ तसाच आहे.

Back to top button