लॉकडाऊनच्या काळात बनवली लाकडी सायकल! | पुढारी

लॉकडाऊनच्या काळात बनवली लाकडी सायकल!

अमृतसर :

लॉकडाऊनच्या काळात सर्व काही ठप्प असताना घरी बसून करायचे काय, असा प्रश्‍न अनेकांना पडला होता. अशा काळाचा अनेकांनी नवे सृजन घडवण्यासाठी सदुपयोगही करून घेतला. पंजाबमधील सुतारकाम करणार्‍या एका व्यक्‍तीने याच काळात अतिशय सुबक अशी लाकडी सायकल बनवली!

पंजाबच्या जिरकपूर येथे राहणार्‍या 40 वर्षांच्या धनीराम सग्गू यांनी ही सायकल बनवली आहे. ही सायकल आता तेथे चांगलीच लोकप्रियही झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात हाती कोणतेही काम नव्हते त्यावेळी धनीराम यांनी आपले कौशल्य पणाला लावून ही सायकल बनवली. त्यासाठी त्यांनी घरीच पडलेले लाकडाचे तुकडे व प्लायवूडचा वापर केला. घरात एक जुनी सायकल होती. तिच्या यांत्रिक रचनेचा नीट अभ्यास करून त्यांनी ही नवनिर्मिती केली. त्यासाठी आधी त्यांनी सायकलीची एक ब्लू प्रिंटही बनवली. जुन्या सायकलीचे पॅडल, रिम, सीट आणि साईड स्टँडचा त्यांनी यासाठी वापर केला. पहिले डिझाईन करण्यासाठी त्यांना एक महिना लागला. दुसर्‍या प्रयत्नात त्यांनी कॅनेडियन वूडचा वापर केला. हे लाकूड अधिक हलके, स्वस्त आणि टिकाऊ असते. या सायकलीचे वजन वीस किलो आहे. तिला डिस्क ब—ेकही आहेत. 

Back to top button