चोरी करायला गेला आणि चक्‍क झोपला! | पुढारी

चोरी करायला गेला आणि चक्‍क झोपला!

हैदराबाद :

झोप ही तनमनाच्या विश्रांतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र, नको त्या वेळी डोळ्यावर झापड आली, तर अपघातासारखे प्रकारही संभवतात. चोरांना तर झोप गहाण ठेवूनच आपला ‘कार्यभाग’ उरकून घ्यावा लागतो; मात्र एका चोराला झोप अनावर झाली आणि तो ज्या घरात चोरी करण्यासाठी घुसला होता तेथे चोरी करण्याचे सोडून चक्‍क झोपला.

ही घटना आंध— प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात घडली. तिथे 22 वर्षांचा एक चोर एका घरात चोरपावलांनी घुसला होता. तो आधीच थकलेला होता आणि घरात एसी सुरू असल्याने तेथेच त्याचा डोळा लागला. सत्ती वेंकट रेड्डी नावाच्या एका पेट्रोल पंप मालकाच्या घरात हा ‘बाबू’ नावाचा चोर पहाटे चार वाजता घुसला होता. बेडरूममधील सुखद, गार हवेने तो तेथेच झोपला आणि चक्‍क घोरूही लागला. त्याच्या घोरण्याचा आवाज ऐकून रेड्डी जागे झाले व त्यांनी त्याला त्याच खोलीत कोंडून ठेवले. त्यांनी तत्काळ पोलिसांना फोन लावला. सातच्या सुमारास पोलीस घरी आले. तोपर्यंत ‘बाबू मोशाय’ झोपलेलेच होते. त्याने डोळे उघडले त्यावेळी समोर पोलीस उभे होते. चौकशीमध्ये आढळले, की हा सराईत चोर नसून आर्थिक अडचणीमुळे तो असे चुकीचे काम करण्यास प्रवृत्त झाला होता.

Back to top button