पृथ्वीजवळच्या अवकाशात कचर्‍याचे 16 कोटी तुकडे | पुढारी

पृथ्वीजवळच्या अवकाशात कचर्‍याचे 16 कोटी तुकडे

न्यूयॉर्क :

माणूस जिथे जिथे गेला तिथे त्याने कचरा करून ठेवला. मग ते एव्हरेस्टसारखे उत्तुंग पर्वतशिखर असो की समुद्रतळ. अगदी अंतराळातही मानवनिर्मित कचरा साठला आहे आणि तो पृथ्वीलाच धोकादायकही ठरू लागला आहे. संशोधकांनी म्हटले आहे की अवकाशीय कचर्‍याचे 16 कोटी तुकडे सध्या पृथ्वीभोवती फिरत आहेत. त्यामध्ये निकामी झालेले उपग्रह, यानांचे भाग, रॉकेटस् आदींचा समावेश आहे. आता बि—टनने हा कचरा स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली आहे.

जगभरातील अनेक देशांनी आपले कृत्रिम उपग्रह पृथ्वीजवळच्या अवकाशात सोडलेले आहेत. अशाच सॅटेलाईटस्नी या कचर्‍यात भर घातलेली आहे. भविष्यातील अंतराळ संशोधनाच्या कार्यातही हा कचरा व्यत्यय बनू शकतो. त्यामुळे बि—टनने हा कचरा थोडा साफ करण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. तेथील भारतीय वंशाचे बिझनेस सेक्रेटरी आलोक शर्मा यांनी देशाची अंतराळ संशोधन संस्था ‘यूकेएसएस’च्या माध्यमातून हा कचरा साफ करण्यासाठी एका निधीची घोषणा केली. दहा लाख पौंडाच्या या निधीचा उपयोग अंवकाशीय कचरा साफ करण्यासाठी केला जाईल. अर्थात हा कचरा कसा साफ केला जाईल यासाठीची ठोस पद्धत अद्याप ठरवलेली नाही. सध्या पृथ्वीच्या कक्षेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकही फिरत आहे. तिथे अनेक अंतराळवीर राहून वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करीत असतात. या स्थानकालाही अशा कचर्‍याने धोका निर्माण होऊ शकतो. अंतराळात प्रत्येक वस्तूचा आकारही बराच महत्त्वाचा ठरतो. अगदी छोटे तुकडे तिथे वेगवान असतात व धोकादायक ठरतात. अंतराळातील असे तुकडे सध्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली आहेत आणि ताशी 18 हजार मैल वेगाने पृथ्वीभोवती फिरत आहेत. तेथील 16 कोटी तुकड्यांपैकी किमान दहा लाख तुकडे एक सेंटीमीटरपेक्षा मोठ्या आकाराचे आहेत. ते उपग्रहांशी धडकण्याचा धोका नेहमीच भेडसावत असतो. एखाद्या सॅटेलाईटलाही हे तुकडे धडकून ते निकामी करू शकतात.

Back to top button