सोनू सूदने दिला सज्‍जड इशारा  | पुढारी

सोनू सूदने दिला सज्‍जड इशारा 

मुंबई :

एखाद्याच्या चांगुलपणाचा, दातृत्वाचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक असतात. सोनू सूदने लॉकडाऊनच्या किंवा त्यानंतरच्या काळातही अनेक प्रकारे गरजूंना मदत केली. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी सुरक्षितपणे पोहोचवणे, गरीब-गरजूंना अर्थसहाय्य करणे अशी अनेक कामे त्याने मोठ्या प्रमाणात केली व अजूनही करतो आहे. मात्र, त्याच्या नावाचा वापर करून काहींनी फसवेगिरीही सुरू केली. हे समजताच सोनू संतापला आणि त्याने ट्विटरवरून अशा लोकांना सज्जड दमही भरला!

सोनूकडे कुणीही, कुठूनही मदत मागितली ती सोनू अशा व्यक्‍तीला शक्य ती सर्व मदत देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याच्या वेळीच मिळालेल्या अशा मदतीने अनेक लोक भारावून गेले. कुणी आपल्या मुलाचे नाव ‘सोनू’ ठेवले तर कुणी आपल्या नव्या वर्कशॉपला सोनूचे नाव दिले. मात्र, त्याच्या नावाचा काही लोक गैरवापरही करीत असल्याचे दिसून आले. हे लोक सोनूच्या नावावर लोकांना फसवत असल्याचे आढळले. सोनूने ट्विटरवर काही स्क्रीनशॉट शेअर करून अशा लोकांना इशारा दिला. त्याने म्हटले, कृपया, माझी मदत मिळावी म्हणून कुणालाही एक रुपयाही देऊ नका. आमच्या सर्व सेवा अगदी मोफत आहेत. लोकांकडून पैसे उकळणार्‍यांना माझे निवेदन आहे की गरिबांना फसवण्यापेक्षा या लोकांनी मला भेटावे. कष्टाची भाकरी कशी मिळवायची हे मी त्यांना शिकवेन. चांगली कमाई व ईमानदारीचे जीवन श्रेष्ठ आहे!

Back to top button