‘लिबर सेन्स’ देईल ब्लड शुगरची माहिती | पुढारी

‘लिबर सेन्स’ देईल ब्लड शुगरची माहिती

वॉशिंग्टन : रक्‍तातील शुगरचे प्रमाण वाढणे आणि घटणे या दोन्ही प्रक्रिया घातकच असतात. अशा स्थितीत शुगर लेव्हलची तपासणी अत्यंत महत्त्वाची ठरते. हीच माहिती जर आपल्याच स्मार्टफोनवर तातडीने मिळू लागली तर ते अधिकच चांगले होईल. हाच विचार नजरेसमोर ठेवून अमेरिकेतील एका औषध उत्पादक कंपनीने खास उपकरण विकसित करण्यात यश मिळविले. यामुळे शरीरातील शुगर लेव्हलची अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. 

अमेरिकेतील इलिनॉयसस्थित ‘अबॉट’ नामक कंपनीने एक ‘लिबर सेन्स’ विकसित केला आहे. हा गोलाकार बायोसेन्सर रक्‍तातील शुगर लेव्हलवर नजर ठेवणार्‍या ‘फ्रीस्टाईल लिबर’ तंत्रज्ञानावर आधारित आहे. एखाद्या नाण्याच्या आकाराचे हे उपकरण एका खास पट्टीच्या मदतीने त्वचेवर चिकटते. या पट्टीत बसवण्यात आलेल्या 0.2 इंचाच्या सूक्ष्म सुया शरीरात वाहत असलेल्या रक्‍तापर्यंत पोहोचतात. त्यानंतर लिबर सेन्समध्ये असलेला ‘सेन्सर’ रक्‍तातील शुगर लेव्हलची माहिती स्मार्टफोनला पोहोचविते.

‘लिबर सेन्स’च्या उत्पादक कंपनीशी संबंधित असलेले जेयर्ड वॉटकिन यांनी सांगितले की, लिबर सेन्स हे उपकरण केवळ मधुमेहींसाठीच नव्हे तर व्यायामप्रेमी, अ‍ॅथलिट व अन्य लोकांसाठीही वरदान ठरू शकते. कारण व्यायाम किंवा सरावादरम्यान कमी होणार्‍या शुगर लेव्हलवर नजर ठेवून चक्‍कर, थकवा आणि कमजोरपणापासून  वाचवण्यासाठी वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे.

Back to top button