मंगळावर जीवनाचा शोध घेणे ठरेल आव्हानात्मकच | पुढारी

मंगळावर जीवनाचा शोध घेणे ठरेल आव्हानात्मकच

वॉशिंग्टन : मंगळावरील संभाव्य जीवनाच्या शक्यतेचा शोध घेण्यासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने गेल्या जुलै महिन्यात आपले एक महत्त्वाकांक्षी मिशन लाँच केले. या मिशनअंतर्गत नासा या लाल (मंगळ) ग्रहासंबंधी माहिती मिळविण्याबरोबरच तेथील खडक आणि मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. या नमुन्यांचा सविस्तर अभ्यास केल्यास मंगळासंबंधीच्या अनेक रहस्यांवरील पडदा उठण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मंगळासंबंधीच्या एका नव्या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार मंगळाच्या जमिनीवर आणि जमिनीखाली असलेले ‘जैविक पुरावे’ तरल आम्ल पदार्थांमुळे नष्ट होऊ शकतात. एकदा हे तरल आम्ल पदार्थ मंगळाच्या जमिनीवरून वाहिले आहेत. अशा स्थितीत लोहाने समृद्ध असलेल्या या ग्रहावरील जीवनसंबंधीच्या शक्यतांचा शोध घेणे आणखी आव्हानात्मक ठरू  शकते.

अमेरिकेची ‘कॉर्नेल युनिव्हर्सिटी’ तसेच स्पेनची ‘सँट्रो डी अ‍ॅस्ट्रोबायोलॉजिया’मधील संशोधकांनी वरील निष्कर्ष हा ‘सिम्युलेशन’ प्रक्रियेअंतर्गत मातीत अ‍ॅमिनो अ‍ॅसिड मिसळून त्यावर संशोधन करून काढला आहे. ‘नेचर सायंटिक रिपोर्टस्’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातील माहितीनुसार मंगळाच्या मातीत अ‍ॅमिनो अ‍ॅसिड मिसळल्यास तेथील बायोलॉजिकल मटेरियल (जैविक सामग्री) नष्ट होऊ शकते.

Back to top button