जमीन विकून पत्नीसाठी विकत आणला हत्ती! | पुढारी

जमीन विकून पत्नीसाठी विकत आणला हत्ती!

ढाका ः

पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधणारा शाहजहान सर्वांनाच ठावूक आहे. मात्र, एखादा सामान्य माणूसही पत्नीसाठी असामान्य गोष्ट करू शकतो. बांगला देशात एका पतीने आपल्या पत्नीचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या जमिनीचा एक तुकडा विकला आणि चक्‍क हत्ती विकत आणला!

बांगला देशाच्या लालमोनिरहाटच्या दुलाल चंद्र रॉय यांनी हे हत्तीएवढे मोठे काम केले आहे. त्यांनी आपली पत्नी तुलसी राणी दासी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या जमिनीचा दोन गुंठे हिस्सा विकला आणि 16.5 लाख टकांमध्ये एक हत्ती खरेदी केला. गेल्याच आठवड्यात त्यांनी वीस हजार टक्याने एक ट्रक भाड्याने घेऊन त्यामधून या हत्तीला घरी घेऊन आले. त्यांच्या पत्नीने एक वर्षापूर्वी आपण हत्ती खरेदी केला असून, त्याची देखभाल करीत आहोत, असे स्वप्न पाहिले होते.

पत्नीचे हे स्वप्न खरे करण्याचा चंग दुलाल रॉय यांनी बांधला होता. विशेष म्हणजे असे पहिल्यांदा घडलेले नाही. यापूर्वी पत्नीच्या अशाच स्वप्नांमुळे त्यांनी एक घोडा, हंस आणि बकराही खरेदी केलेला आहे! आता खरेदी केलेल्या हत्तीच्या देखभालीसाठी त्यांनी पंधरा हजार मासिक वेतनावर एक माहुतही ठेवला आहे.

Back to top button