कोरोना रुग्णांचे मूत्रपिंड खराब होण्याचा धोका | पुढारी

कोरोना रुग्णांचे मूत्रपिंड खराब होण्याचा धोका

न्यूयॉर्क ः

‘कोव्हिड-19’च्या रुग्णांच्या किडनी म्हणजेच मूत्रपिंड खराब होण्याचा किंवा त्या क्षतिग्रस्त होण्याचा धोका वाढू शकतो, असे अमेरिकन संशोधकांनी म्हटले आहे. मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्याचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी’मध्ये देण्यात आले आहेत.

या संशोधनानुसार ‘कोव्हिड-19’च्या रुग्णांमध्ये विद्राव्य यूरोकॅकेन रिसेप्टरचा स्तर वाढतो. हे एक प्रतिकारक क्षमता निर्माण करणारे प्रोटिन आहे आणि तेच किडनीची हानी होण्याचेही कारण बनू शकते. जोचन रेसर या संशोधकाने सांगितले की हे रिसेप्टर एक असे कारक आहे जे हजारो रुग्णांच्या मूत्रपिंडांची हानी करण्याचे कारण बनू शकते. एचआयव्ही किंवा ‘कोव्हिड-19’ला कारणीभूत ठरणार्‍या ‘सार्स-कोव्ह-2’ या ‘आरएनए’ विषाणूंमुळे रक्‍तात या रिसेप्टरचा स्तर वाढू लागतो.

जर ही प्रक्रिया हायपरइन्फ्लेमेटरी असेल तर मूत्रपिंडाच्या पेशींचे नुकसान होऊ शकते. ‘कोव्हिड-19’ च्या एक तृतीयांशापेक्षाही अधिक रुग्णांना डायलिसिसची गरज भासते. त्यांच्या मृत्यूचा धोकाही अधिक असतो. संशोधकांनी 352 रुग्णांमधील रिसेप्टरचा स्तर तपासून पाहिला. यापैकी एक चतुर्थांश रुग्णांच्या मूत्रपिंडांची वेगाने हानी झाली होती.

Back to top button