खासगी कंपनीने बनवलेल्या देशातील पहिल्या क्रायोजेनिक इंजिनचे अनावरण | पुढारी

खासगी कंपनीने बनवलेल्या देशातील पहिल्या क्रायोजेनिक इंजिनचे अनावरण

चेन्‍नई :

‘स्कायरूट एरोस्पेस’ या अंतराळ संशोधन क्षेत्रातील स्टार्टअपने क्रायोजेनिक इंजिन बनवले असून, ‘इस्रो’च्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिलेल्या प्रा. सतीश धवन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्याचे अनावरण करण्यात आले. ‘धवन-1’ असे नाव या क्रायोजेनिक इंजिनला देण्यात आले आहे. हे इंजिन कंपनीच्याच ‘विक्रम-2’ या रॉकेटमध्ये वापरले जाईल.

घनरुप इंधन वापरलेल्या एका इंजिनच्या कंपनीने आधीच चाचण्या घेतल्या आहेत. मात्र, क्रायोजेनिक इंजिन हे अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामधील तंत्रज्ञानाची जटिलता आणि इंधन हाताळण्याची त्याची क्षमता महत्त्वाची आहे. क्रायोजेनिक इंजिनमध्ये द्रवरुप इंधनाचा आणि अतिशय थंड तापमानासाठी ऑक्सिडायजरचा वापर केला जातो. ‘क्रायोजेनिक’ ही एक ‘जेनेरिक’ संकल्पना आहे जी उणे 150 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी तापमानाच्या स्थितीसाठी वापरली जाते.

अशी इंजिन रॉकेटच्या वरच्या भागासाठी वापरली जातात. ‘स्कायरूट एरोस्पेस’ने म्हटले आहे की हे क्रायोजेनिक इंजिन द्रवरुप नैसर्गिक वायू (एलएनजी)चा आणि ऑक्सिडायजर म्हणून द्रवरुप ऑक्सिजनचा वापर करील. हे भारतातील पहिलेच पूर्णपणे ‘क्रायोजेनिक’ असे इंजिन आहे.

Back to top button