म्हशीने हँडपंप चालवून पिले पाणी! | पुढारी

नवी दिल्ली : एरवी अनेक लोक रेडा किंवा म्हशीला ‘बिनडोक प्राणी’ म्हणूनच पाहत असतात; पण वास्तवात तसे नसते. प्रत्येक जीवाला निसर्गाने माणसाइतकी नसली तरी स्वतःच्या गरजा नीट भागतील इतकी बुद्धी दिलेली आहे. घड्यात खडे टाकून वर आलेले पाणी पिणार्या कावळ्याची गोष्ट आपण लहानपणी ऐकली होती. मात्र, आधुनिक काळातील एक कावळा चोचीने नळ खोलून पाणी पित असतानाचा व्हिडीओही अलीकडेच समोर आला होता. आता एक म्हैस शिंगांनी हँडपंप चालवून कूपनलिकेचे पाणी पित असतानाचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे.
या व्हिडीओमध्ये दिसते की ही म्हैस शिंगांनी हँडपंप खाली-वर करते व पाणी पडू लागले की ते प्राशन करते. पाणी येण्याचे थांबले की ती पुन्हा शिंगांनी पंप खाली-वर करते. अशा पद्धतीने ती आपली आणि एका रेडकाचीही तहान भागवते. या म्हशीला हँडपंपचा वापर कसा करायचा व पाणी कसे मिळवायचे हे ज्ञान कुठून व कसे मिळाले हे कळण्यास मार्ग नाही. मात्र, ती हँडपंपचा प्रभावी वापर करून आपली तहान भागवत असताना या व्हिडीओत दिसते. तो व्हिडीओ सोशल मीडियात येताच अल्पावधीतच व्हायरल झाला. चार लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. एरवी ‘अक्ल बडी या भैंस’ असे विचारले जाते; पण या म्हशीनेही आपली अक्कल दाखवून दिली आहे!