‘या’ देशाची लोकसंख्या अवघी 33 | पुढारी

‘या’ देशाची लोकसंख्या अवघी 33

न्यूयॉर्क : एखाद्या एकत्र कुटुंबातील सदस्यांची संख्या 35-36 असू शकते. आपल्या देशात तर मिझोराममधील एका कुटुंबात तर तब्बल 162 सदस्य आहेत. अशा स्थितीत जर एखाद्या देशाची लोकसंख्या अवघी 33 आहे असे म्हटल्यावर आपल्याला आश्‍चर्य वाटू शकते. ही लोकसंख्याही माणसं आणि प्राणी मिळून आहे! हा देश अमेरिकेतील नेवाडा प्रांताजवळ आहे.

या देशाचा राष्ट्राध्यक्ष आणि हुकुमशहा केविन बग हा आहे. नेवाडाजवळील या परिसरात हा ‘देश’ बनण्यामागील किस्साही रंजकच आहे. केविन बग हे हायस्कूलचे विद्यार्थी होते त्यावेळी जेम्स स्पाइलमॅन नावाच्या आपल्या एका मित्राबरोबर 1977 मध्ये याठिकाणी आले होते. कालांतराने दोघांनी मिळून ही जागा घेतली व तिथे राजेशाही सुरू केली. स्पाइलमॅन राजा बनला आणि केविन प्रधान.

वय वाढल्यावर ‘राजा’ स्पाइलमॅन आणि त्याची पत्नी हे ‘राज्य’ सोडून गेले. केविन मात्र तिथेच राहिले. त्यांनी या ‘देशा’ला ‘रिपब्लिक ऑफ मोलोसिया’ असे नाव दिले. नेवाडाच्या डेटन कौंटीचा हा भाग आता एक छोटा देश म्हणून ओळखला जातो. पाच एकर जागेत असलेल्या मोलोसियाच्या 1.3 एकर जागेत केविनचे कुटुंब राहते. त्यांच्या कुटुंबात पत्नी व सात मुलं आहेत. याशिवाय या देशात त्यांचे काही नातेवाईक आणि पाळीव प्राण्यांनाही नागरिकत्व देण्यात आले आहे! गेल्यावर्षी मोलसियामध्ये 101 पर्यटकांनी हजेरी लावली होती. पर्यटकांना याठिकाणी येताच मोलोसियन बँकेतून आपले चलन बदलून घ्यावे लागते. तिथे एक पोस्ट ऑफिसही आहे. पर्यटकांना या देशात ‘मोलोसिया’ टॅग असलेले टी-शर्टही मिळू शकतात.

Back to top button