निळ्या जेलीफिशने वेधले नेटिझन्सचे लक्ष | पुढारी

निळ्या जेलीफिशने वेधले नेटिझन्सचे लक्ष

लंडन : निळेभोर आकाश आणि त्यामुळेच निळा दिसणारा समुद्र यामध्ये वावरत असलेल्या तशाच निळ्या जेलीफिशने आता नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या 30 सेकंदांच्या या व्हिडीओने लोकांवर भुरळ घातली. इंग्लंडमधील मरिन कॉन्झर्व्हेशन सोसायटीने 24 सप्टेंबरला हा व्हिडीओ शेअर केला होता. त्याला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

केथ बोरसडन यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. गेरलोच हार्बरमध्ये त्याचे चित्रीकरण झाले होते. हे बंदर तेथील जेलीफिशसाठीच प्रसिद्ध आहे. मात्र, असा निळाशार जेलीफिश अनेकांच्या पाहण्यात यापूर्वी आला नव्हता. तो ‘सायनिया लमारकी’ या नावाने ओळखला जातो. शरीराचे आकुंचन-प्रसारण करून वावरत असलेला हा सागरी जीव त्याच्या विशिष्ट रंगामुळे व आकाराने लोकांचे लक्ष वेधून गेला. सुंदर व आकर्षक वाटणारे हे जीव वास्तवात धोकादायकही ठरू शकतात. बर्‍याच वेळा ते किनार्‍यावरही येत असतात; पण त्यांच्यापासून सावध राहणे गरजेचे असते.

 

Back to top button