किनार्‍यावर वाहून आला अनोखा जलचर | पुढारी

किनार्‍यावर वाहून आला अनोखा जलचर

वॉशिंग्टन : समुद्राच्या अथांग दुनियेत अनेक अज्ञात जीवही आहेत ज्यांची अद्याप विज्ञानाला माहिती नाही. दरवर्षी जलचरांच्या अशा अनेक नव्या प्रजातींचा शोध घेतला जात असतो. आता एका बेटाच्या किनार्‍यावर असाच एक अनोखा जलचर वाहून आला आहे. त्याला ‘रेड ग्लोब’ असे म्हटले जात आहे. हा सात पायांचा ऑक्टोपस असावा असा अंदाज आहे.

या जलचराची लांबी 3.5 फूट म्हणजे एक मीटर असून, त्याचा रंग गडद तांबडा आहे. तो उथळ पाण्यात आढळणारा ईस्ट पॅसिफिक रेड ऑक्टोपस आहे, असे अनेकांना वाटते. काहींना हा खोल समुद्रात आढळणारा ‘व्हॅम्पायर स्क्‍वीड’ असावा असे वाटते. काही संशोधकांनी हा खोल समुद्रातील ‘डम्बो ऑक्टोपस’ असावा असेही म्हटले आहे. मात्र, हा या तीनपैकी कोणत्याही प्रजातीचा नाही, असे स्पष्ट झाले. तो सात पायांच्या ऑक्टोपसच्या प्रजातीमधील असल्याचे आता म्हटले जात आहे. याबाबत अधिक संशोधन सुरू आहे. व्हाईडबे आयलंडच्या किनार्‍यावर हा जलचर आढळून आला. हे बेट सिएटलच्या उत्तरेला आहे. 

Back to top button