छतावर उभी केली स्कॉर्पिओ | पुढारी | पुढारी

छतावर उभी केली स्कॉर्पिओ | पुढारी

गया : आपल्या मालकीचे व हक्‍काचे घर असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. स्वतःचे घर असले की ते आपल्या मनाप्रमाणे सजवता येते. बिहारमधील भागलपूरमध्ये राहणार्‍या एका व्यक्‍तीने आपल्या इमारतीच्या छतावर चक्‍क स्कॉर्पिओ गाडी उभी केली आहे. येणारे-जाणारे लोक इमारतीवरची गाडी पाहून आश्‍चर्यचकीत होतात. तसेच तेथे कशाला गाडी उभी केली आहे, असा प्रश्‍न त्यांच्या मनात उपस्थित होतो.

भागलपूर येथील रहिवासी इंतसार आलम यांनी आपल्या इमारतीवर उभी केलेली स्कॉर्पिओ ही गाडी नसून ती एक पाण्याची टाकी आहे. इंतसारने स्कॉर्पिओच्या आकारात पाण्याची टाकी बांधण्यासाठी आग्य्राहून खास कारागिरांना बोलाविले होते. या कामगारांनी पाण्याच्या टाकीचे असे काही बांधकाम केले की टाकी म्हणजे हुबेहूब स्कॉर्पिओच वाटावी.

उल्लेखनीय म्हणजे इंतसारने या टाकीवर बीआर 786 असा नंबरही लिहिला आहे. या टाकीतून संपूर्ण घरात पाईपच्या मदतीने पाणी फिरवण्यात आले आहे. यासाठी इंतसारने सुमारे अडीच लाख रुपये खर्च केले आहेत. दरम्यान, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी इमारतीच्या छतावरील स्कॉर्पिओचे छायाचित्र शेअर केले आहे. त्यांनी खाली लिहिले आहे की, इसी को मै राईज स्टोरी कहता हूँ, स्कॉर्पिओ राईजिंग रूफटॉप.

 

Back to top button