अंतराळ स्थानकाला झाली दोन दशके पूर्ण | पुढारी

अंतराळ स्थानकाला झाली दोन दशके पूर्ण

नवी दिल्ली : सर्वसामान्यपणे असे म्हटले जाते की, पृथ्वीशिवाय मानव कोठेच राहत नाही. मात्र, असेही एक ठिकाण आहे की तेथे गेल्या 20 वर्षांपासून लोक राहत आहेत. या ठिकाणाला ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक’ (आयएसएस) असे म्हटले जाते. येथे सातत्याने अंतराळ प्रवाशांचे येणे-जाणे होते. 2 नोव्हेंबर 2000 रोजी अमेरिकन अंतराळयात्री बिल शेफर्ड यांनी रशियन सहकारी सर्गेई क्रिकालेव व युरी गिडजेंको यांच्यासमवेत आयएसएसवर पाऊल ठेवले होते. तेव्हापासून गेल्या दोन दशकात 19 देशांचे 241 लोक या स्थानकावर राहून आले आहेत.

‘आयएसएस’ हे एक मोठे अवकाश यान आहे. जेथे अंतराळ यात्री राहतात. तसेच ही एक अद्ययावत प्रयोगशाळा असून तेथे अंतराळयात्री वेगवेगळे प्रयोग अथवा शोध लावण्याचे काम करत असतात. हे अवकाश यान पृथ्वीपासून सुमारे 250 मैल म्हणजे 402 कि.मी. अंतरावरून पृथ्वीभोवती फिरत असते. याचा ताशी वेग तब्बल 17500 कि.मी. इतका प्रचंड आहे.

2011 मध्ये झाले पूर्ण तयार

‘आयएसएस’चा पहिला भाग म्हणजे कंट्रोल मोड्यूलच्या रूपात 1998 मध्ये रशियन रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आला. त्यानंतर पुढील दोन वर्षांत अनेक भाग त्याला जोडले गेले. त्यानंतर 2 नोव्हेंबर 2000 रोजी पहिले पथक ‘आयएसएस’वर दाखल झाले. त्यानंतरही आवश्यक असलेले इतर भागही जोडण्याचे काम सुरूच होते. 2011 मध्ये हे सर्व काम पूर्ण झाले. यामध्ये अमेरिका, रशिया, जपान आणि युरोपच्या प्रयोगशाळांचा समावेश आहे. 

120 अब्ज आला आहे खर्च

‘आयएसएस’ला तयार करण्यासाठी एकूण 120 अब्ज डॉलर्स इतका खर्च आला आहे. ते पृथ्वीभोवतीचा एक फेरा 90 मिनिटांत पूर्ण करते. म्हणजे एक सेकंदाला ते 5 मैल अंतर कापते. हे स्पेस स्टेशन 24 तासांत पृथ्वीभोवतीच्या 16 फेर्‍या पूर्ण करते. यादरम्यान ते 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त पाहते. पॅगी व्हिटसन यांनी तब्बल 665 दिवस ‘आयएसएस’वर घालवले आहेत. दरम्यान, स्पेस स्टेशन एकूण 109 मीटर लांब आहे.

दुसरे जग शोधणे हे ‘नासा’चे लक्ष्य

‘आयएसएस’च्या माध्यमातून मानवाची अंतराळातील उपस्थिती निश्‍चित झाली. तेथील अनेक शोध हे मानवासाठी लाभदायी ठरू लागले आहेत. याशिवाय ‘नासा’चे एक लक्ष्य म्हणजे ‘आयएसएस’च्या मदतीने दुसरे जग शोधणे हे होते.

 

Back to top button