कोरोना काळात हृदय मजबूत ठेवणे महत्त्वाचे | पुढारी

कोरोना काळात हृदय मजबूत ठेवणे महत्त्वाचे

न्यूयॉर्क : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. या व्हायरसची बाधा झालेल्यांची संख्या आता 4 कोटी 68 लाखांहून अधिक झाली आहे. तर 12 लाखांहून अधिकांनी आपला प्राण गमावला आहे. दरम्यान, 3 कोटी 70 लाख, 53 हजार लोकांनी कोरोनावर मातही केली आहे. मात्र, कोरोनासंबंधी आणखी एका नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार हा विषाणू मानवी हृदयासाठी घातक ठरत आहे. कोरोनामुळे मांसपेशीवर परिणाम होत असून यामुळे हृदयासंबंधी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळेच कोरोना काळात हृदयाची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

शिकागो युनिव्हर्सिटीतील डॉक्टर सीन पिन्‍नी यांच्या मते, हा व्हायरस रक्‍तवाहिन्यांवरही वाईट परिणाम करू शकतो. कोरोनामुळे रक्‍तवाहिन्यांतर्गत सूज येऊ शकते, अथवा रक्त्याच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. यामुळे प्रसंगी हृदयविकाराचा धक्‍का बसू शकतो. हे संभाव्य धोके ओळखून लोकांनी हृदय मजबूत ठेवणे महत्त्वाचे ठरते.

कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांच्या शरीरातील रक्‍तामध्ये गुठळ्या झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याशिवाय या विषाणूच्या प्रभावामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमताही घटू लागते. यामुळे शरीराला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत नाही. यामुळेच अशा स्थितीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत हृदय मजबूत ठेवणे महत्त्वाचे ठरते.

 

Back to top button