रशियात 25 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरचे अवशेष सापडले | पुढारी

रशियात 25 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरचे अवशेष सापडले

वॉशिंग्टन :

रशियातील एका शालेय मुलाने ‘इचथ्योसोर’ या प्रजातीच्या 25 कोटी वर्षांपूर्वीच्या प्राचीन डायनासोरचे अवशेष शोधून काढले आहे. हा सरपटणारा जलचर प्राणी असून तो पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी होता, असा समज आहे. या मुलाने शोधलेल्या डायनासोरच्या अवशेषाचा अभ्यास शास्त्रज्ञांच्या पथकाने केला आहे. 

उल्लेखनीय म्हणजे डायनासोरचे अवशेष शोधलेल्या सात वर्षांच्या दमित्री सिरेंको यालाही डायनासोरबद्दल फारच कुतुहल वाटते. यामुळेच त्याने लहान वयातच या कोट्यवधी वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या डायनासोरचा भरपूर अभ्यास केला आहे. 

सात वर्षीय दमित्री सिरेंको हा आपल्या बहिणीसोबत पूर्व रशियातील ‘रस्की’ या बेटावर खेळत होता. यावेळी तो एका खडकावर आदळला. उल्लेखनीय म्हणजे याच खडकावर एका मोठ्या प्राण्याचे निशाण होते. आपल्या यशासंदर्भात बोलताना दमित्री म्हणाला की, मला डायनासोर फारच आवडतात. मी नेहमीच या प्राण्याची हाडे शोधण्याची स्वप्ने पाहात असतो. 

या लहान मुलाच्या अद्भूत शोधाची पुष्टी स्थानिक जीवाश्म संशोधन शास्त्रज्ञांनी केली. ज्यावेळी हे शास्त्रज्ञ घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथे सरपटणार्‍या मोठ्या प्राण्याचे अवशेष दिसून आले. हे अवशेष ‘इचथ्योसोर’ प्रजातीच्या डायनासोरचे असू शकतात. हे प्राणी समुद्री जलचर होते. आता या शास्त्रज्ञांनी दगडात गाढलेले हे अवशेष काळजीपूर्वक खोदण्याचा निर्णय घेतला आहे.

Back to top button