अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मिळते २.९ कोटी वेतन | पुढारी

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मिळते २.९ कोटी वेतन

वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. एकूणच ट्रम्प आणि बायडेन यांच्यात काट्याची टक्‍कर आहे. मात्र, सद्यस्थिती पाहता बायडेन बाजी मारणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना जगातील सर्वाधिक शक्‍तिशाली व्यक्‍ती म्हणून ओळखले जाते. या पदावर विराजमान होणार्‍या व्यक्‍तीला वर्षाला वेतन म्हणून किती रक्‍कम मिळत असेल, असा प्रश्‍न निर्माण होतो. मात्र, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांपेक्षाही आणखी दोन ते तीन देशांच्या राष्ट्राध्यक्षांना मिळणारे वेतन अधिक आहे. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना वेतन म्हणून वर्षाला तब्बल 400,000 डॉलर मिळतात. भारतीय चलनात ही रक्‍कम 2.9 कोटी रुपये इतकी होते. याशिवाय त्यांना विविध प्रकारच्या भत्त्यांचाही लाभ मिळतो. कार्यकाळादरम्यान त्यांना व्हाईट हाऊस तर मिळतेच, याशिवाय प्लेन, हेलिकॉप्टर यासारख्या सुविधाही मिळतात. कार्यकाळ संपल्यानंतर पेन्शनही मिळते. हा सर्व खर्च सरकारी खजिन्यातूनच होतो.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना वार्षिक भत्ता म्हणून 50 हजार डॉलर्स (40 लाख रुपये) मिळतात. ते एक लाख डॉलर खर्चाची यात्रा करू शकतात. यावर कोणताच कर नसतो. तसेच एंटरटेन्मेंट भत्ता म्हणून 19 हजार डॉलर्स (14 लाख रुपये) मिळतात. दरम्यान, 2001 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना 200,000 डॉलर वेतन मिळत होते. मात्र, आता यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

 

Back to top button