आता आला हवेत उडणारा झाडू | पुढारी

आता आला हवेत उडणारा झाडू

लंडन : आता बाजारात चक्क हवेत उडणारा झाडू आला आहे, असे सांगितल्यास तुमचा यावर निश्चितपणे विश्वास बसणार नाही. मात्र, हे खोटे नसून अगदी खरे आहे. जर तुम्ही हॅरी पॉटरचा सिनेमा पाहिला असाल तर तुम्हाला त्यातील उडणार्‍या झाडूबद्दल निश्चितपणे कल्पना असणार. आता हाच झाडू केवळ रिलमध्ये नाही तर रियल लाईफमध्येही दिसणार आहे. हा झाडू म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची जादूच आहे. तो तंत्राने अथवा मंत्राने उडणारा नसून तो विजेच्या मदतीने उडणार आहे.

हवेत उडणारा हा झाडू रियल फ्लाईंग ब्रूम प्रोजेक्टअंतर्गत तयार करण्यात आला आहे. झाडूची किकस्टार्टरअंतर्गत निर्मिती करण्यात येत आहे. निर्माती कंपनी नूवेमने स्पष्ट केले आहे की, हा झाडू हवेत उडणार नाही; पण तसा तुम्हाला निश्चितपणे अनुभव येईल.

या अनोख्या झाडूची लांबी 51 सेंटीमीटर इतकी असून तो कार्बनिक स्टिलने तयार केला आहे. त्यावर इलेक्ट्रोस्टेटिक पेंट लावण्यात आला आहे. या प्रोजेक्टसाठी रुसो नामक कंपनीने एक इलेक्ट्रिक सायकल घेतली आणि तिला जादुई ब्रूमस्टिकमध्ये बदलून टाकले. 

या झाडूवर बसण्यासाठी एक सीटही आहे. जेेणेकरून लोकांना यावर आरामात बसता येईल. उल्लेखनीय म्हणजे ही सीट सोयीप्रमाणे अ‍ॅडजेस्ट करता येते. चालवण्यासही हा झाडू अत्यंत सोपा आहे. पुढच्या बाजूने वाकल्यास या झाडूचा वेग वाढतो आणि मागे वाकल्यास ब्रेक लागतो. हा झाडू आकर्षक दिसण्यासाठी त्याला मागच्या बाजूने सोन्याच्या तारा लावण्यात आल्या आहेत. याची विक्री मार्च 2021 पासून सुरू करण्यात येणार आहे.

Back to top button