प्रदूषण ठरतेय नवजात मुलांसाठी धोकादायक | पुढारी | पुढारी

प्रदूषण ठरतेय नवजात मुलांसाठी धोकादायक | पुढारी

न्यूयॉर्क : प्रदूषण ही एक आता जागतिक समस्या बनली आहे, त्यामुळे अनेक घातक आजारांचा जन्म होत आहे. यामुळे दरवर्षी लाखो लोक मृत्यूच्या विळख्यात सापडत आहेत. भारतामध्येही वायूचे प्रदूषण धोकादायक रूप प्राप्त करत आहे. हिवाळ्यामध्ये तर ही समस्या आणखी गंभीर बनते.

वायू प्रदूषणासंदर्भात एक नवा; पण भयावह अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामधील माहितीनुसार 2019 मध्ये वायू प्रदूषणामुळे जगभरात 4,76 लाख मुलांचा मृत्यू झाला आहे. या काळात एकट्या भारतात 1.16 लाख मुलांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतेक नवजात बालकांचा मृत्यू कमी वजन आणि वेळेपूर्वीच जन्मल्याने निर्माण झालेल्या समस्यांमुळे झाला आहे. मात्र, वायू प्रदूषण आता लहान मुलांच्या मृत्यूचे दुसरे मोठे कारण बनू लागले आहे आणि हे निश्चितच चिंताजनक आहे. अमेरिकेतील बिगर सरकारी संस्था हेल्थ इफेक्टस् इन्स्टिट्यूटने (एचईआय)  जगभरातील वायू प्रदूषणाबाबतचा आपला अहवाल नुकताच सादर केला. यामध्ये वायू प्रदूषण हे भारतातील आरोग्यासाठी मोठे संकट ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान, स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2020 नामक अहवालामध्ये दीर्घ काळच्या वायू प्रदूषणाच्या प्रभावामुळे 2019 मध्ये स्ट्रोक, हृदय विकाराचा धक्का, मधुमेह, फुफ्फुसाचा कर्करोग आणि नवजात बालकांशी संबंधित आजारांनी बहुतेक मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button