दुसरा विवाह नाही केल्यास तुरुंगवास | पुढारी

दुसरा विवाह नाही केल्यास तुरुंगवास

जोहान्सबर्ग : जगभरात शक्यतो एकदाच विवाह करण्यावर भर दिला जातो. आपल्या देशांमध्ये तर दोन बायका फजिती ऐका, असे म्हटले जाते. याशिवाय अनेक देशांमध्ये द्विभार्ग प्रतिबंधक कायदाही लागू करण्यात आला आहे. मात्र, जगात असा एक देश आहे की तेथील प्रत्येक पुरुषाला दोन महिलांशी विवाह करावाच लागतो. कडक कायद्यामुळे दुसर्‍या विवाहास पहिली पत्नी हरकत घेऊ शकत नाही. 

पुरुषांना जबरदस्तीने दुसरा विवाह करावयास भाग पाडणारा कायदा आफ्रिका खंडातील एका देशात लागू आहे. हा देश म्हणजे ‘इरिट्रिया’ होय. येथे कायद्यामुळे प्रत्येक पुरुषाला दोन पत्नींशी संसार हा करावाच लागतो आणि हे बंधनकारक आहे. एखाद्या पुरुषाने दुसरा विवाह करण्यास नकार दिला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. यासाठी त्याला शिक्षा म्हणून जेलमध्येही घातले जाते.

इरिट्रियामध्ये कायद्याने दोन विवाह बंधनकारक करण्याचे कारणही तसेच आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे इरिट्रिया आणि इथियोपिया या दोन देशांदरम्यान झालेले युद्ध. यामुळे इरिट्रियात महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या फारच कमी आहे. यामुळेच तेथे दोन विवाह बंधनकारक आहेत. पुरुषांबरोबरच महिलांसाठीही असाच कायदा लागू आहे. तेथील महिला कायद्याने आपल्या पतीच्या दुसर्‍या लग्‍नात व्यत्यय आणू शकत नाहीत. तरीही एखाद्या महिलेने आपल्या पतीच्या दुसर्‍या विवाहात व्यत्यय आणल्यास तिला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येते. यामुळे तेथील पुरुषांना अडचणीविना दुसरा विवाह करता येतो.

Back to top button