असमतोल आहाराचा होतो उंचीवर परिणाम | पुढारी

असमतोल आहाराचा होतो उंचीवर परिणाम

न्यूयॉर्क : पौष्टिक जेवणाच्या कमतरतेमुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होतो. मेडिकल जर्नल लॅन्सेंटमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनातील निष्कर्षानुसार पौष्टिक आहार न मिळाल्यास कोणत्याही क्षेत्रातील मुलांच्या उंचीवर 20 सें.मी. (7.9 इंच) इतका परिणाम होऊ शकतो. यामुळे मुलांचे वय आणि त्यांची सरासरी उंची याचा विचार करून त्यांना दीर्घकाळ समतोल आहार मिळतो की नाही, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. 

मुलांच्या उंचीसंदर्भात करण्यात आलेल्या या संशोधनात मुलांची उंची आणि वजनामध्ये जेनेटिक्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, ज्यावेळी संपूर्ण लोकसंख्येचा विचार करावा लागतो, त्यावेळी आहार आणि पर्यावरण हे दोन घटक महत्त्वाचे ठरतात.

या संशोधनातील माहितीनुसार 2019 मध्ये 19 वर्षे वयोगटातील मुलांची उंची नेदरलँडमध्ये अधिक होती. तेथे या मुलांची सरासरी उंची 183.8 सें.मी. (सुमारे 6 फूट) इतकी होती. तर याच वयोगटातील सरासरी कमी उंची असलेली मुले तिमोरमध्ये आढळली. या मुलांची सरासरी उंची 160.1 सें.मी. अथवा 5 फूट 3 इंच इतकी होती. उल्लेखनीय म्हणजे या संशोधनादरम्यान 5 ते 19 वर्षे वयोगटातील सुमारे 6.5 कोटी मुलांच्या डाटाचे विश्‍लेषण करण्यात आले. तसेच ही आकडेवारी 1985 ते 2019 दरम्यान झालेल्या 2000 हून अधिक संशोधनातून मिळविण्यात आली होती.

 

Back to top button