तरुणानेच चावून ठार मारले विषारी सापाला  | पुढारी

तरुणानेच चावून ठार मारले विषारी सापाला 

लखनौ : सापाच्या दंशाने माणसाचा मृत्यू झाल्याच्या घटना आपण सातत्याने पाहतो आणि ऐकतोही. मात्र, तुम्ही तरुणाने चावल्याने सापाचा मृत्यू झाल्याची घटना कधी ऐकली आहे का? उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात नेमकी अशीच घटना घडली. तेथे नशेत असलेल्या एका तरुणाने सापाच्या मानेचा असा काही चावा घेतला की, त्यामुळे सरपटणार्‍या धुडालाच मृत्यूला सामोरे जावे लागले.

उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यामधील असरौली गावात ही अनोखी वाटणारी घटना घडली आहे. तेथे नशेत असलेल्या तरुणाला विषारी सापाने दंश केला. यावेळी प्रचंड नशेत असलेल्या त्या तरुणाने आपल्या जीवावर बेतेल, याचा काहीच विचार केला नाही. याउलट त्याने दंश करणार्‍या सापाला पकडले आणि त्याच्या मानेजवळ कडकडून चावा घेतला. गंभीर जखमी झाल्याने सापाचा मृत्यू झाला. एवढ्यावर त्या तरुणाचा राग शांत झाला नाही तर त्याने त्या सापाचे चावून चावून तीन तुकडे केले.  यावेळी तेथील एका तरुणाने व्हिडीओ तयार केला. सध्या हाच व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून शेजार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली व सापाला एका पिशवीत घालून तरुणाला तातडीने उपचारासाठी आग्रा येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर ग्रामस्थानी सापावर अंतिम संस्कार केले.

 

Back to top button