प्रदूषणामुळे वाढला फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका | पुढारी

प्रदूषणामुळे वाढला फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका

नवी दिल्ली : धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो हे आपल्याला माहिती आहेच; पण हवेच्या प्रदूषणामुळेही अशा कर्करोगाचा धोका असतो. आता राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरने म्हटले आहे की वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोकाही वाढला आहे. 

नोव्हेंबर महिना फुफ्फुसाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्याचा महिना म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्त ‘आरजीसीआयआरसी’च्या डॉ. एल. एम. डारलाँग यांनी सांगितले की फुफ्फुसाचा कर्करोग हा केवळ धूम्रपान करणार्‍या लोकांना होणारा आजार राहिलेला नाही. हवेच्या प्रदूषणामुळे अनेक लोक या आजाराच्या विळख्यात अडकत आहेत. अगदी तरुण मुलं-मुलीही या आजाराला बळी पडत आहेत.

दुर्दैवाने या आजाराचे निदान रोग बळावल्यावर होत आहे. त्यामुळे मृत्यूंची संख्याही अधिक आहे. भारतात कर्करोगाने जे मृत्यू होतात त्यामध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाने होणार्‍या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. स्तन, प्रोस्टेट किंवा कोलन कॅन्सरने होणार्‍या एकूण मृत्यूंपेक्षाही ते अधिक आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाले तर रुग्णाचे प्राण वाचण्याची शक्यता अधिक असते. मात्र, केवळ दहा टक्के रुग्णच उपचारासाठी लवकर येतात.

Back to top button