नीलांशीचा सर्वात लांब केसांबाबत नवा विश्‍वविक्रम | पुढारी

नीलांशीचा सर्वात लांब केसांबाबत नवा विश्‍वविक्रम

अहमदाबाद : गुजरातच्या अरवल्‍ली जिल्ह्यातील मोडासा येथे राहणार्‍या नीलांशी पटेल हिने तिसर्‍यांदा आपलाच विक्रम मोडून नवा विक्रम बनवला आहे. सर्वात लांब केसांची किशोरवयीन मुलगी असलेली नीलांशी तिसर्‍यांदा आपलाच विक्रम मोडणारी ‘टीनएजर’ म्हणजेच वीसपेक्षा कमी वर्षे वयाची मुलगी ठरली आहे. 

नीलांशीने वयाच्या सहाव्या वर्षापासून केसांना कात्री लावलेली नाही. 2018 मध्ये तिच्या केसांची लांबी 170.5 सेंटीमीटर होती. त्यानंतर तिने केसांची आणखी निगा राखून त्यांना वाढू दिले. गेल्यावर्षी तिचे केस 190 सेंटीमीटर म्हणजेच सहा फूट 2.8 इंच लांबीचे होते. आता तिच्या केसांची लांबी 6 फूट 6.7 इंच आहे. 2018 च्या सुरुवातीला सर्वात लांब केसांचा विक्रम अर्जेंटिनाच्या अ‍ॅब्रिल लॉरेनजटी हिच्या नावावर होता.

तिच्या केसांची लांबी 152.5 सेंटीमीटर होती. अ‍ॅब्रिलचा विक्रम सतरा वर्षांच्या कीटो कवाहारा हिने मोडला होता. तिचे केस 155.5 सेंटीमीटर होते. यावर्षी नीलांशीने पंधरा सेंटीमीटरच्या मार्जिनने सर्व विक्रम मोडीत काढले. वयाच्या सहाव्या वर्षी एका स्थानिक सलूनमध्ये तिने केस कापले होते व तो हेअर कट तिला आवडला नव्हता. त्यावेळेपासून तिने केस कापणे टाळले होते. नीलांशीच्या मैत्रिणी तिला परिकथेतील लांब केसांची ‘रपुन्झल’ म्हणून संबोधतात.

Back to top button